‘ईमू’ पक्षाने केली दिल्ली पोलिसांची दमछाक!

दिल्लीच्या रिंग रोडर अचानक अवतरलेल्या या ईमू पक्षाने, ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची चांगलीच दमछाक केली.

Mumbai
emu bird at delhi
दिल्लीच्या रिंग रोडवर आढळला ईमू पक्षी (सौजन्य-hindustantimes)

राजधानी दिल्लीतील रिंग रोडवर नुकताच एक गमतीशीर प्रकार घडला. रहदारीच्यावेळी रिंग रोडवरील स्मृति स्थळाजवळ ट्रॅफिक पोलिसांना एक ईमू पक्षी आढळला. भर रस्त्यात अचानक आलेल्या ऑस्ट्रेलियन ईमूला पाहून पोलीस चक्रावून गेले. याशिवाय त्या ईमूला पाहून रस्त्यावरील लोकांमध्येदेखील चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे काही आपत्ती ओढावू नये यासाठी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस ईमूला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने धावले. दरम्यान ही बातमी समजतच जवळच्या स्थानिक पोलीसही त्याठिकाणी हजर झाले. मात्र, या ईमू पक्ष्याने पोलिसांना चांगलच पळवलं. ईमूला पकडण्यासाठी बराचवेळ पोलीस त्याच्या मागे धावत होते. धावून धावून पोलिसांची अक्षरश: दमछाक झाल्यानंतर अखेर तो ईमू त्यांच्या हातात सापडला. दरम्यान भर रस्त्यात पोलिसांना ईमूच्या मागे धावताना पाहून लोकांचा आणखीनच गोंधळ उडाला.

ईमूची सुरक्षित रवानगी

पोलिसांनी ईमूला पकडण्यासाठी सर्वप्रथम त्याचे दोन्ही पाय पकडून त्याचे पाय बांधून टाकले. त्यामुळे ईमूची हालचाल आपोआपच मंदावली. त्यानंतर पोलीस बराचवेळ ईमूला पाणी पाजत राहिले, ज्यादरम्यान त्यांनी वाईल्ड लाईफ संघटनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले. वाईल्ड लाईफचे अधिकारी स्थळावर पोहतचाच पोलिसांनी ईमूला त्यांच्याकडे सुरक्षितपणे सोपवले. या प्रसंगामुळे दिल्लीच्या रिंग रोडवर काहीकाळ चांगलीच खळबळ माजली होती. दरम्यान जंगलातून आलेला हा ईमू पक्षी रस्ता भरकटल्यामुळे शहरात आला असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे यमुना नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई भासत असल्याामुळे, पाण्याच्या शोधासाठी हा ईमू शहरात आल्याचंही बोललं जात आहे.

‘ईमू’विषयी थोडक्यात

दरम्यान ईमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. ईमू शहामृगानंतरचा जगातील दुसरा सर्वात मोठा पक्षी मानला जातो. ईमू पक्ष्याची जीवन मर्यादा जास्तीत जास्त ४० ते ४५ वर्ष इतकी असते. उपलब्ध माहितीनुसार ईमू पक्ष्याची मादी ऑक्टोबर ते मार्च या ६ महिन्यांच्या कालावधीत दर आठवड्याला दोन अंडी देते. त्यांच्या एका अंड्याचे वजन ५०० ते ८०० ग्रॅम असते. या अंड्याची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात साधारण पंधराशे ते दोन हजार रुपये इतकी असते. पाहा, ईमू पक्ष्याची एक झलक…

व्हिडिओ सौजन्य- युट्यूब