घरदेश-विदेशसर्वत्र वातावरण सरकारविरोधी, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती!

सर्वत्र वातावरण सरकारविरोधी, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती!

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या एकूण ७ टप्प्यांपैकी सर्वात मोठ्या तिसर्‍या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले. हे मतदान होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळ्याची भीती व्यक्त केली. ‘देशात आणि राज्यात जनमत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती वाटते’, अशा शब्दात मशीनचा मुद्दा पुन्हा एकदा पवारांनी उकरून काढला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या सुरात सूर मिसळताना टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनीही ईव्हीएममध्ये मोठी गडबड होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेतून जावे, ही जनभावना असली तरी ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो, हाच खरा चिंतेचा विषय आहे. मी अनेक मतदारसंघांत फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान फिरवले जाऊ शकते किंवा ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केली जाऊ शकते, असे माझे मत असल्याचेही पवार म्हणाले.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केला जात आहे. आम्ही अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले.

अखिलेश यादव, सीताराम येच्युरी यांनी देखील ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘महाराष्ट्रात भाजपची अवस्था वाईट आहे. इथे सर्व जागा आघाडीने जिंकल्या पाहिजेत. उ.प्र.मध्ये देखील त्यांच्याविरोधात वातावरण आहे. मग भाजपला मतदान कसे होणार? फक्त ईव्हीएम मशीन्स हॅक करुनच भाजपला मतदान होऊ शकते’, अशी भूमिका यावेळी सर्व विरोधी पक्षांनी एकमताने मांडली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, सीपीआय(एम) महेंद्र सिंग, पीसीसीच्या शांती चौहान, तृणमूल काँग्रेस खासदार नझमूल हक, भारतीय मुस्लिम लिगचे कोरम ओमर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य डॉ. जी.एच. फर्नांडिस, लोक तांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी.के.एस. इलांगोवल, सीपीआय महाराष्ट्रचे प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करावी 

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. सत्ताधारी पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाही, असा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला.आयकर विभागाकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीन प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आमच्या निदर्शनास आले आहे की, ईव्हीएम मशीन मॅनिप्युलेट केली जावू शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. बॅलटिंग पॉईंट, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरले जात आहेत असेही नायडू म्हणाले.

निवडणुकीचे ५० हजार कोटी पाण्यात गेले-अखिलेश यादव
देशभरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मत दिले जाते एका निशाणीवर मात्र जाते ते भलतीकडेच. याशिवाय बर्‍याच ठिकाणी भाजपलाच मत जात आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या दाव्यानुसार कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण न दिल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत. देशात ३५० पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या आहेत. हा निष्काळजीपणा आहे. निवडणुकीसाठी खर्च होणारे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -