घरदेश-विदेशराम मंदिर उभारणीसाठी खोदकाम; पुरातन मूर्ती, नक्षीदार खांब सापडले

राम मंदिर उभारणीसाठी खोदकाम; पुरातन मूर्ती, नक्षीदार खांब सापडले

Subscribe

लॉकडाऊनचा कालावधी सुरू असतानाही योगी सरकारने सर्व खबरदारी घेत राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याकरता खोदकाम सुरू केले आहे. मागील दहा दिवसांपासून अयोध्येतील निश्चित केलेल्या ठिकाणी हे काम सुरू असून, जागेचे सपाटीकरण करण्यासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले. देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तुंचे अवशेष सापडले.

देशात करोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामे ठप्प होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना मुभा दिली असून, मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या कामालाही सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणार्‍या नियोजित ठिकाणी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. दहा दिवसांपासून काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे.

- Advertisement -

शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्माण करण्यात यावे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम सुरू केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -