‘आम्ही दगडफेक करणारे नाहीत’; फारुख अब्दुल्ला भडकले

आम्ही दगडफेक करणारे किंवा ग्रेनेड फेकणारे नाहीत. आम्ही शांततेने आमची लढाई लढत आहोत. सरकार कलम ३७० मुद्यावरुन जनतेची दिशाभूल करत आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.

Srinagar
Farooq-Abdullah-
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

राज्यसभेत कलम ३७० आणि ३५ ‘अ’ रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या स्थानिक पक्षांमध्ये केंद्र सरकारच्या प्रती रोष निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. आम्ही ग्रेनेड फेकणारे आणि दगडफेक करणारे नाहीत. आम्ही शांततेत आमची लढाई लढतोय, असे अब्दुल्ला म्हणाले आहेत. त्याचबरोबर मोदी सरकार आमचा हत्येचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आम्ही ज्या भारताला ओळखतो तो हा भारत नाही’, असेही अब्दुल्ला म्हणाले.

नेमकं काय म्हणाले अब्दुल्ला?

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील नेत्यांची काय प्रतिक्रिया राहिल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य होते. अखेर या विषयावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांजवळ आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘सरकार ३७० कायद्यावरुन जनतेची दिशाभूल करत आहे. या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ.’ त्याचबरोबर आपण लोकसभेत का गेला नाहीत? असा प्रश्न विचारला असता, ‘आम्हाला घरात नजरकैद करण्यात आले आहे. माझं राज्य जळत असताना मी घरात कसा थांबू शकतो? सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधील नेत्यांना अटक केली’, असे अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फारुख हे आपल्या मर्जीने घरी थांबले आहेत. त्यांना मी गनपॉईंटवर संसदेत आणू शकत नाही, असे स्पष्टीकरण शहा यांनी दिले आहे.

मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक

सोमवारी केंद्रिय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत या संदर्भात प्रस्ताव मांडला त्यावेळी पीडीपीच्या खासदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी संसदेबाहेर आंदोलने केली. मात्र, अखेर सायंकाळी कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनाने मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला या दोघांना अटक करण्यात आली आहे. यावर फारख अब्दुल्ला यांनी सरकार आपल्या बळाचा दुरुपयोग करत असल्याचे म्हटले आहे.