ओला-उबरमुळेच ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी! केंद्रीय अर्थमंत्र्यांचा अजब दावा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मंदीला ओला-उबरला कारणीभूत ठरवलं आहे.

New Delhi
Nirmala-Sitharaman
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

‘ओला-उबरमुळे देशात ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी आली आहे’, असा अजब दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. लोकांनी स्वत:च्या कारपेक्षा ओला-उबरने प्रवास करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच कार खरेदी कमी झाली असून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी आली आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे. त्यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या असून याआधी ओला-उबर नव्हतं का? याच वर्षी ओला-उबरचा परिणाम कसा जाणवायला लागला? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, सलग १०व्या महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्राने विक्रीमध्ये घट नोंदवली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादकांमध्ये चिंता वाढू लागली आहे.

२३ टक्क्यांची विक्रमी घट

भाजपचं नवं सरकार केंद्रात आल्यानंतर पहिल्या केंद्रीय महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मात्र, तेव्हापासूनच सेन्सेक्सनं खाली नाक करून प्रवास सुरू केला. त्यापाठोपाठ ऑटोमोबाईल क्षेत्राचाही प्रवास मंदीच्या दिशेने वेगाने होत असल्याचं निदर्शनास आलं. गेल्या १० महिन्यांपासून या क्षेत्रामध्ये हळूहळू मंदीचं सावट येऊ लागलं होतं. त्यातच गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट, २०१९मध्ये ऑटोमोबाईल विक्रीमध्ये २३.५५ टक्के इतकी विक्रमी घट झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मात्र याचं खापर ओला-उबरवर फोडलं आहे!


पाहा, पोट धरून हसाल – काय म्हणता? ओला-उबर? निर्मला सीतारमण झाल्या तुफान ट्रोल!

ओला-उबरचं काय चुकलं?

‘सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्रीघट दिसून येत आहे. बीएस६ (आधुनिक तंत्रज्ञानाची एक श्रेणी) आणि ओला उबरचा परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रावर झाला आहे. लोकांनी स्वत:ची कार खरेदी करणं कमी केलं असून ग्राहकांचं प्राधान्य ओला-उबरला आहे. त्यामुळेच या क्षेत्रात मागणी कमी होऊन विक्री घटू लागली आहे’, असं त्या म्हणल्या आहेत. दरम्यान, निर्मला सीतारमण यांच्या या दाव्याची विरोधकांनी टर उडवली आहे.