उत्तराखंडमध्ये अग्निकल्लोळ थांबेना! आता सारी भिस्त पावसावरच!

वन खात्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

उत्तराखंडमध्ये जंगलाला लागलेली आग वाढतच चालली आहे. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीने आता उत्तराखंड पाठोपाठ हिमाचल प्रदेश आणि काश्मिरच्या जंगलाला देखील वेढले आहे. या आगीवर नियंत्रण मिळवणे वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कठीण होत चालले आहे. तसेच आगीमुळे परिसरात उष्णता वाढली आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी केले जाणारे प्रयत्नही निष्फळ ठरत आहेत.

वनविभाग पावसाच्या प्रतिक्षेत

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभाग, अग्निशमन दल आणि वायूसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण जोरदार वाऱ्यामुळे आग वाढतच चालली आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावसावरच अवलंबून राहावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या आगीवर नियंत्रण मिळवणे आता फक्त पावसामुळेच शक्य होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता वनविभाग पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र दुसरीकडे हवामान खात्याने २७ तारखेपर्यंत पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता वनविभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हजारो हेक्टर जंगल जळून खाक

उत्तराखंड सरकारच्या निर्देशांनुसार गेल्या ८ दिवसांत जंगलाला आग लागण्याच्या ३००० घटना घडल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत २०६५ हेक्टर जंगल या आगीत जळून खाक झालं आहे. या आगीमुळे करोडो रुपयांच्या वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालं आहे. ही आग लवकरात लवकर विझली नाही, तर या भागातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वन्य प्राण्यांचा मृत्यू

जंगलाला लागलेल्या भीषण आगीत फक्त वनसंपत्तीचं नुकसान झालं नाही, तर या जंगलात वास्तव्याला असलेल्या प्राणी आणि पक्ष्यांचाही मृत्यू झालाय. आगीमध्ये मृत्यू झालेल्या काही प्राण्यांचे फोटोही सोशल मीडियावर वायरल होत आहे. मात्र हे फोटो उत्तराखंडच्या जंगालात मृत्यू झालेल्या प्राण्यांचे नसून सोशल मीडियावरुन हा चुकीचा संदेश पोहोचवला जात असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

आगीमुळे रेड अलर्ट

उत्तराखंड सरकारकडून आग विझण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ३५०० अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ६ हजार वन कर्मचारी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वायूसेना आणि एनडीआरएफ टीमकडूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता उत्तराखंड सरकारने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, मानवी प्रयत्न अयशस्वी ठरत असल्यामुळे आता निसर्गावरच सारी भिस्त असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here