जमिनीच्या वादात ९ जणांची हत्या, उ. प्र.मधील धक्कादायक घटना!

जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या लोकांना स्थानिक ग्रामस्थांनी अडवलं म्हणून गोळीबारात ९ ग्रामस्थांचा जीव घेतल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

Mumbai
firing in UP
याच गावात झाला गोळीबार!

संपत्तीच्या वादातून टोकाची भूमिका घेणं, एकमेकांच्या जिवावर उठणं असे प्रकार आपण अनेकदा ऐकले असतील. पण उत्तर प्रदेशमध्ये अशाच एका जमिनीच्या वादातून ९ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये ३ महिलांचा देखील समावेश असल्याचं वृत्त आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातल्या घोरवाल भागामध्ये ही घटना घडली आहे. आसपासच्या परिसरातल्या सुमारे १०० एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाला. या घटनेमध्ये १९ जण जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

आधी हाणामारी..नंतर गोळीबार!

घोरवाल तालुक्यातल्या सापही गावामध्ये जमिनीवर काही लोक जमून चर्चा करत होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादावादीचं हाणामारीत रुपांतर झालं. हाणामारीदरम्यान यातल्याच काहींनी बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या अंदाधुंद गोळीबारामध्ये जमलेल्या लोकांपैकी ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये ३ महिलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातल्या ९ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून इतर १९ जणांवर उपचार सुरू आहे. त्यातही अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

विरोध करणाऱ्या स्थानिकांवर गोळीबार

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित पोलिसांकडून त्याची सविस्तर माहिती घेतली आणि सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच, दोषींवर कारवाई करण्यासाठी कार्यक्षम कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी या अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचानं काही वर्षांपूर्वी सुमारे ९० एकर जमीन खरेदी केली. या जमिनीचा ताबा घेण्यासाठी जेव्हा हा सरपंच तिथे गेला, तेव्हा त्याला स्थानिक ग्रामस्थांनी अडवलं. त्यातून निर्माण जालेल्या वादात त्यानं ग्रामस्थांवर गोळीबार केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here