CoronaVirus : फ्लिपकार्टने केली भारतातील सेवा स्थगित!

देशातील ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीमधील मोठ्या कंपन्या असलेल्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतातील आपली सेवा काही काळासाठी स्थगित केली आहे.

Mumbai
flipkart

जगभरात ज्या प्रमाणे करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याचप्रमाणे भारतात देखीर करोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. आत्तापर्यंत भारतातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ५००च्या वर गेली असून मृतांचा आकडा देखील १० झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी वॉलमार्टच्या मालकीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने भारतातली सेवा काही काळासाठी स्थगित केली आहे. मात्र, ही सेवा नक्की कधीपर्यंत स्थगित राहणार, याविषयी मात्र कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर होमपेजवरच यासंदर्भातली सूचना लिहिण्यात आलेली आहे. फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटवरचे सर्व प्रॉडक्ट काढून टाकले आहेत. त्यामुळे आता फ्लिपकार्टवरचे प्रॉडक्ट ‘आऊट ऑफ स्टॉक’ दाखवत आहेत.

आपल्या ग्राहकांना लिहिलेल्या संदेशामध्ये फ्लिपकार्टने म्हटलं आहे, ‘आम्ही तात्पुरती आमची भारतातली सेवा स्थगित करत आहोत. सध्याचा काळ हा कठीण आहे. याआधी कधीही आपण असे वेगळे राहिलो नव्हतो. याआधी कधीही घरातच राहणं ही देशसेवा ठरली नव्हती. आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही घरातच थांबा, सुरक्षित राहा. आपण सगळे मिळून या संकटावर नक्कीच मात करू’.

flipkart

वेबसाईटवरच्या वस्तू ‘आऊट ऑफ स्टॉक’

या संदेशासोबतच फ्लिपकार्टने करोनासंदर्भातली माहिती देणाऱ्या सरकारी संकेतस्थळांची लिंक देखील दिली आहे. त्यासोबतच करोना टाळण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेले निर्देश देखील फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटच्या होमपेजवर लिहिले आहेत. दरम्यान, विक्री जरी फ्लिपकार्टने बंद केली असली, तरी त्यांच्या वेबसाईटवरून अजूनही बिल पेमेंटची सुविधा सुरू आहे.

अॅमेझॉनची सेवाही तात्पुरती स्थगित

फ्लिपकार्टच्या आधी अॅमेझॉनने भारतातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री थांबवली आहे. ‘सध्याच्या कठीण काळात आमच्या ग्राहकांच्या हवाबंद अन्नधान्य, आरोग्यविषयक वस्तू, स्वच्छतेविषयक वस्तू, वैयक्तिक सुरक्षेच्या वस्तू यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची पूर्ण यंत्रणा गुंतवत आहोत. त्यामुळे सध्या सुरू असलेली इतर वस्तूंची डिलीव्हरी देखील आम्ही काही काळासाठी स्थगित करत आहोत’, असं अॅमेझॉनने जाहीर केलं होतं.


CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here