घरदेश-विदेश'कर्नाटकच्या भाजप प्रमुखांना साधा कॉमन सेन्स नाही'

‘कर्नाटकच्या भाजप प्रमुखांना साधा कॉमन सेन्स नाही’

Subscribe

कर्नाटक भाजप अध्यक्षांना साधा कॉमन सेन्ससुद्धा नाही. मला त्यांची कीव येते, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागले असतानाच दुसरीकडे कर्नाटकमध्ये मात्र सत्तेचा वेगळाच सारीपाट सुरू झाला आहे. बहुमत हारल्यानंतर सरकार पडलेले काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता भाजपवर कठोर शब्दांमध्ये टीका करायला सुरुवात केली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख नलीन कुमार कटील यांच्यावर सिद्धरामय्यांनी निशाणा साधला आहे. ‘कर्नाटकच्या कर्नाटक भाजपचे प्रमुखांची मला कीव येते. त्यांना साधा किमान कॉमन सेन्स देखील नाही’, अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.

शिवकुमार यांच्या अटकेवरून वाद

कर्नाटकमधील काँग्रेसचे ‘ट्रबलशूटर’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते डी. शिवकुमार यांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक केली. यावरून आता भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ‘शिवकुमार यांच्या अटकेमागे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच असतील, अशी मला शंका आहे. त्यांना शिवकुमार यांची प्रगती पाहावली जात नव्हती’, असं वक्तव्य कटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केलं होतं. ‘२०१७मध्ये जेव्हा सिद्धरामय्या मुख्यमंत्री होते, तेव्हाच ईडीने शिवकुमार यांच्या घरावर धाड टाकली होती. तेव्हा शक्य असून देखील सिद्धरामय्या यांनी ती धाड थांबवली नाही’, असं देखील कटील म्हणाले. आता त्यालाच उत्तर देताना सिद्धरामय्यांनी कटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

- Advertisement -

‘मला त्यांची कीव येते’

सिद्धरामय्यांनी कडवट शब्दांमध्ये कटील यांना उत्तर दिलं आहे. ‘मला त्यांची कीव येते. त्यांना साधा किमान कॉमन सेन्स देखील नाही. त्यांनी केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे असत्य आणि चुकीचं आहे. राजकीय हेतूनेच ते अशी वक्तव्य करत आहेत’, असं सिद्धरामय्या म्हणाले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये भाजप-काँग्रेस वादाचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -