घरदेश-विदेशमाजी केंद्रीय अर्थमंत्रीअरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्रीअरुण जेटली यांचे निधन

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी शनिवारी दुपारी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्टपासून एम्सच्या टीमने त्यांना निरीक्षणासाठी दाखल केले होते. पण त्यांची तब्येत सातत्याने खालावत गेल्याने शनिवारी ते मृत पावल्याचे एम्सकडून जाहीर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. जेटली यांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत जेटली यांचे पार्थिव त्यांच्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांचे पार्थिव कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी दुपारी १२ वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी दुपारी २च्या सुमारास दिल्लीतील निगम बोध घाटावर जेटलींवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अरुण जेटली हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होेते. ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना मांडीतील पेशींचा कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कलादेखील जाऊन आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना किडनीच्या रोगाचे निदान झाले. गेल्या वर्षी १४ मे २०१८ रोजी त्यांची एम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.अरुण जेटली यांनी राजकीय क्षेत्रातील कार्यासह विविध त्रासदायक आजारांविरोधात प्रखर झुंज दिली.

- Advertisement -

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा हे वेळोवेळी एम्समध्ये जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे सातत्याने जेटलींच्या प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांच्या संपर्कात होते. पण जेटली यांची प्रकृती खालावतच गेली आणि शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विद्यार्थी कार्यकर्ता ते भाजपचे ज्येष्ठ नेते

विद्यार्थी नेता ते केंद्रीय अर्थमंत्री असा अरुण जेटली यांचा प्रवास भारतीय राजकारणात आदर्शवत असा राहिला आहे. या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. जेटली यांच्या राजकीय प्रवासास विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली होती. जेटली यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. आपल्या युक्तिवादाने भल्याभल्यांना गारद करणार्‍या जेटली यांची संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणूनही प्रचंड गाजली होती. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी सत्ताधारी काँग्रेसच्या नाकी नऊ आणले होते.
अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे वकील होते. जेटलींनी नवी दिल्लीच्या सेंट झेवियर्स शाळेमधून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्याच श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स शाखेतून पदवी घेतली. नवी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवीही घेतली. विद्यापीठात शिकत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी राजकीय प्रवासास सुरुवात केली. ते विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडूनही आले.

- Advertisement -

१९९१ पासून ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते . १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला. वाजपेयींच्या सरकारमध्ये जेटलींकडे निर्गूंतवणूक खात्याचे राज्यमंत्रीपदही देण्यात आले होते. २००० मध्ये त्यांच्याकडे विधी, न्याय मंत्रालयाचा कार्यभार होता २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली. २०१४ ला ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले.

२०१४-१६ मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार पाहिला. २०१४-१७ मध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.

आणीबाणीत तुरुंगवास
१९७५-७७मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणीत त्यांना आधी अंबाला आणि नंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांची अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि अभाविपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षही होते.

अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांनी मोठ्या धैर्याने आणि सहनशीलतेने आपल्या आजाराचा सामना केला. लढवय्या वकील, अनुभवी खासदार आणि उत्कृष्ट मंत्री म्हणून जेटली यांनी राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान दिले आहे.
-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

भाजप आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. एक विद्यार्थी संघटनेतील नेता म्हणूनही त्यांचे कार्य लक्षणीय ठरले. आणीबाणीच्या काळातही सरकारचा विरोध करण्यासाठी ते सर्वात पुढे होते. पक्षाची विचारधारा, ध्येय आणि धोरण समाजापुढे प्रभावीपणे मांडण्यात ते अग्रेसर असत. पक्षाचा सर्वात आवडता चेहरा म्हणून जेटलींकडे पाहिले जाते. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झाले. आपण एक हुशार संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अरुण जेटली यांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांनी सामाजिक जीवनात दिलेले योगदान कायमस्वरुपी लक्षात राहील. एक खासदार आणि मंत्री म्हणूनही ते स्मरणात राहतील.
-सोनिया गांधी, अध्यक्षा, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -