चिमुरड्यांसमोरच आईवर सामुहिक बलात्काराची घटना; पाकिस्तानमधील जनसामान्य रस्त्यावर!

pakistan gang rape incident

एका विदेशी महिलेवर तिच्या मुलांच्या समोरच सामुहिक बलात्कार झाल्याची भीषण घटना पाकिस्तानच्या लाहौरजवळ घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तानाच संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी तपास करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे आता या संतापानं आंदोलनाचं रुप धारण केलं आहे. या प्रकरणी पाकिस्तानी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. पण त्यापैकी कुणीही खटल्याशी संबंधित नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी लाहोर पोलिसांनी संबंधित महिलेलाच दोष दिला असून ‘इतक्या रात्री महिलेने बाहेर पडायला नको होतं. सदर महिला फ्रान्समध्ये राहणारी असल्यामुळेच तिला पाकिस्तानमध्ये फिरणं सुरक्षित वाटलं’, अशी शहाजोग टिप्पणी देखील लाहोर पोलिसांकडून आल्यामुळे त्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.

नक्की काय घडलं?

पाकिस्तानमध्ये काही कामानिमित्त आलेली संबंधित फ्रेन्च महिला तिच्या मुलांसमवेत गुरुवारी सकाळी लाहोरहून गुजरांवाला या ठिकाणी जात होती. मात्र, प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्यात तिची गाडी बंद पडली. रात्रीच्या अंधारात कुणी मदतीला येत नसल्यामुळे जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत तिथेच गाडीमध्ये बसण्याचा निर्णय महिलेने घेतला. मात्र, रात्री काही अज्ञात इसम आले आणि त्यांनी गाडीची काच फोडून या महिलेला बाहेर ओढलं. बाजूच्याच शेतामध्ये तिच्या मुलांसमोरच त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. शिवाय तिच्याकडचे दागिने, रोकड आणि तिचे ३ एटीएम कार्ड देखील ते सोबत घेऊन गेले.

दरम्यान, या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर लाहोर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एकूण १५ जणांना अटक केली. पण या १५ जणांपैकी एकही जण या घटनेशी संबंधित नसल्याचं आता समोर आलं आह. या प्रकरणी लाहोरचे पोलीस प्रमुख उमर शेख यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांचं उत्तर संतापजनक होतं. ‘पाकिस्तानी समाजात कुणीही आपल्या घरच्या महिलांना रात्री एकट्याने प्रवास करायला पाठवणार नाही. या महिलेने सुरक्षित मार्गाचा वापर करायला हवा होता. शिवाय त्यांनी गाडीमध्ये पुरेसं पेट्रोल देखील टाकून घ्यायला हवं होतं. त्या फ्रान्सला राहणाऱ्या आहेत. म्हणून त्यांना अशा प्रकारे रात्री प्रवास करणं सुरक्षित वाटलं’, असं ते म्हणाले.

यावरून आता सोशल मीडियावर टीकेची झोड उठत आहे. पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी ट्वीट करून ‘कोणत्याही परिस्थितीत बलात्काराच्या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही’, अशी भूमिका मांडली.