आश्रमात साध्वीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी बंदुकीच्या जोरावर साधूंना ठेवलं ओलीस

Gang rape of a nun in an ashram

झारखंडच्या गोड्डा येथे एका साध्वीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री काही नराधमांनी आश्रमात प्रवेश करत साध्वीवर सामूहिक बलात्कार केला. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी नराधमांनी बंदुकीच्या जोरावर आश्रमातील साधुंना ओलीस ठेवलं.

गोड्डाचे एसपी वायएस रमेश यांनी सांगितलं की, आश्रमात उपस्थित असलेल्या इतरांना खोलीत बंद करुन साध्वी यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित साध्वी फेब्रुवारीपासून आश्रमात राहत आहे. पीडित साध्वी फेब्रुवारी महिन्यात आश्रमात एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती पण लॉकडाऊनमुळे परत जाऊ शकली नाही. साधूंनी स्थानिकांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. पण लोक मदतीसाठी आश्रमात पोहोचले, तोपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते. सामूहिक बलात्कारानंतर या प्रकरणावरुन राजकारणही सुरू झालं आहे. गोड्डा येथील भाजपचे आमदार अमित मंडल यांनी झारखंड सरकार तसेच स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी पीडित महिलेला सुरक्षा पुरविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी दीपक राणा याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की राणाचा गुन्हेगारीचा इतिहास आहे. या घटनेनंतर पीडितेला (३०) मोठा धक्का बसला आहे. लवकरच सर्व आरोपींना तुरूंगात टाकू, असं आश्वासन पोलिसांनी तिला दिलं.