हाथरसची पुनरावृत्ती; दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेची आत्महत्या

उत्तर प्रदेशमध्ये हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

gangrape on dalit minor girl uttar pradesh
हाथरसची पुनरावृत्ती; दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेची आत्महत्या

उत्तर प्रदेशमध्ये हाथरस प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. संतापजनकबाब म्हणजे पोलिसांनी कारवाई न केल्याने पीडित तरुणीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधील ही घटना असून याप्रकरणी सर्व स्तरांतून टीका होत आहे.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये ८ ऑक्टोबर रोजी एका १५ वर्षीय दलित मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. ही घटना कळताच पीडितीच्या कुटुंबियांनी आणि पीडितीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास धाव घेतली. परंतु, पोलिसांनी त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. तसेच गुन्हा दाखल करण्यास देखील नकार दिला. दरम्यान, पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने पीडित मुलीने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे, असे असले तरी पोलिसांनी बलात्कार झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कुठलीच तक्रार केली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.


हेही वाचा – हैदराबादमध्ये मुसळधार पावसाचा कहर, ११ जणांचा मृत्यू!