घ्या, जर्मनी म्हणतंय, आळशी लोकांमुळे कोरोना नियंत्रणात आला!

साधारणपणे आळशी व्यक्तीला आख्खं जग कायम दूषणं देत असतं. सगळीकडेच त्याला नावं ठेवली जातात. पण जर्मनी हा असा देश आहे, जिथे आळशी व्यक्तींना कोरोना काळातले हिरो म्हणून त्यांचा गौरव केला गेला आहे. जर्मन प्रशासनाने यासंदर्भातला एक व्हिडिओच प्रसिद्ध केला असून त्यामध्ये आळशी लोकांमुळे जर्मनीमधला कोरोना नियंत्रणात आल्याचं सांगण्यात आलं आहे. ९० सेकंदांच्या या जाहिरातीमध्ये शूट करण्यात आलेल्या व्यक्ती आपण आळशी असून कशा पद्धतीने देशाची सेवा केली, हेच छातीठोकपणे सांगताना दिसत आहेत!

या जाहिरातीमध्ये अनेक लोक दावे करत आहेत की ते आळशी असूनही कशा पद्धतीने त्यांच्या आळसाचा देशाला फायदा झाला आहे. एक वयस्कर व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणते २०२०मध्ये कोरोनाचा जेव्हा हल्ला झाला, तेव्हा अचानक जर्मनीचं भवितव्य आम्हा आळशी व्यक्तींच्या हातात आलं. तेव्हा आम्ही धैर्यानं पावलं उचलली आणि जे आमच्याकडून अपेक्षित होतं तेच केलं. अर्थात, आम्ही काहीच केलं नाही. दिवस-रात्र आम्ही घरीच पाय पसरून पडून राहिलो आणि कोरोनाशी लढत राहिलो. आमचा मोर्चा आमचा सोफा होता आणि आमचं धैर्यच आमचं शस्त्र होतं!

या जाहिरातीच्या शेवटी सरकारकडून असा संदेश देण्यात आला आहे की घरी राहूनही तुम्ही देशाचे हिरो बनू शकता. कोरोना व्हायरसला पसरण्यापासून थांबवण्यासाठी हे आवश्यक आहे. सध्या जर्मनीमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात आले असून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.