घरदेश-विदेशमनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

मनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. हा त्रास वाढल्यामुळे ते पुन्हा एकदा अमेरिकेत उपचारांसाठी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात सत्ताबदल होणार की फक्त नेतृत्वबदल? हा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या आजारामुळे त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांनी यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे तशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाईम्स नाऊ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पर्रीकरांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पर्रीकर लवकरच राजीनामा देणार असल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पर्रीकरांच्या राजीनाम्यामुळे गोव्यात बदलणाऱ्या राजकीय सूत्रांमुळे भाजपला सत्ता राखण्यासाठी मोठे डावपेच आखावे लागणार आहेत.

अमेरिकेहून परतल्यानंतर पर्रीकर एकांतवासात

स्वादुपिंडाच्या आजाराने गेल्या ६ महिन्यांपासून मनोहर पर्रीकर त्रस्त आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा मुंबई तसेच अमेरिकेतल्या मल्टि स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. गेल्याच आठवड्यात ७ सप्टेंबर रोजी ते अमेरिकेहून उपचार घेऊन परतले होते. मात्र, त्यानंतर ते राज्यातील भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याला किंवा केंद्रातील नेत्याला भेटले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पर्रीकरांना गुरुवारी पणजीमधील एका खासगी रुग्णालयात अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीला आराम न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ते अमेरिकेला जाणार असल्याचं कळतंय.

- Advertisement -

पक्षश्रेष्ठींजवळ व्यक्त केली राजीनाम्याची इच्छा?

शुक्रवारी मनोहर पर्रीकरांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेहून परतल्यानंतर प्रथमच राज्यातील भाजपचे नेते आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचीही भेट घेतली. या भेटीमध्ये आपण राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे पर्रीकर राजीनामा देणार का? आणि देणार तर कधी? असे प्रश्न गोवेकरी जनतेसोबतच विरोधकांनाही पडले आहेत.

…तर पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार

एकीकडे पर्रीकरांच्या प्रकृतीवर उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे गोव्यातील भाजपच्या कोअर कमिटीने यासंदर्भात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत पुढील धोरणाविषयी चर्चा झाल्यानंतर पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी रुग्णालयात जाऊन पर्रीकरांची भेट देखील घेतली. मात्र, या भेटीनंतर संबंधित नेत्यांनी गोव्यातील विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी राजीनामा दिलाच, तर पुढचा मुख्यमंत्री देखील भाजपचाच असेल यासाठीच्या हालचाली भाजपच्या गोटामध्ये सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसला गोव्यात सत्तास्थापनेचे वेध

पर्रीकरांच्या खालावत जाणाऱ्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विरोधक काँग्रेस पक्षाला सत्तास्थापनेची शक्यता वाटू लागली आहे. राज्यातील काँग्रेसच्या समितीने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी विनंती सादर केली आहे. मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी विनंती काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

घटकपक्षांमध्ये वाढती अस्वस्थता

मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यातील भाजपच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष या सत्तेतील दोन्ही घटकपक्षांकडून राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सध्याच्या ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपचे १३, काँग्रेसचे १७, महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे ३, गोवा फॉरवर्ड पक्षाचे ३ आणि उरलेले ४ अपक्ष आमदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -