Corona: गोव्यातील प्रसिद्ध ‘Sunburn 2020’ महोत्सव यंदा रद्द!

कोरोनाचा धोका लक्षात घेता ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव अखेर रद्द करण्याचा निर्णय

जगभरासह देशातही कोरोना व्हायरसची प्रकरणं अद्याप समोर येत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात रहावा यासाठी सार्वजनिक कार्यक्रम, मोठे सोहळे यावर महाराष्ट्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, गोवा सरकारने यंदाचा ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव (Sunburn festival 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने यापूर्वी या महोत्सवाला मान्यता दिली होती. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर आता हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा सरकारने ‘सनबर्न’ला परवानगी दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी शहरात निदर्शने केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी गोवा राज्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी जाहीर केले की, ‘सनबर्न २०२०’च्या आयोजकांना देण्यात आलेली परवानगी विभागाने मागे घेतली आहे. आपल्या निवेदनात ते म्हणाले की, ‘गोव्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका असल्याने आम्ही नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास परवानगी देत नसल्याचेही गोवा राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला देशातूनच नाही तर, जगभरातून अनेक पर्यटक हजेरी लावत असतात. तर ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव २०२०, २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत उत्तर गोव्यातील वॅगाटर गावात होणार होता. गोवा राज्यातही कोरोनाचा कहर असल्याने हा प्रसिद्ध महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचा धोका लक्षात घेता ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गोव्यासह इतर ठिकाणच्या नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.


Bihar Election Results LIVE : NDA ला स्पष्ट बहुमत मिळणार?; रात्रीपर्यंत अंतिम निकाल येणार