…आणि गो एअरचं प्रवासी विमान थेट शेतात घुसलं!

तब्बल १८० प्रवाशांसोबत गो एअरचं विमान बंगळुरूमध्ये थेट गवतामध्ये उतरलं आणि प्रवाशांच्या पोटात भितीचा गोळा आला!

Bengaluru
Grass Patch
गवतात उतरलेल्या विमानामुळे शेताची अशी छाटणी झाली!

आपल्यापैकी बहुतेकांनी विमानाने प्रवास केला असेल. कित्येकांनी तो यासाठी केला नसेल कारण त्यांना विमानाची, वर हवेत जायची किंवा हवेतूनच ‘वर’ जायची भिती वाटत असते. तर काहींनी तो आव्हान घेत केला असेल की ‘बघतोच काय होतं विमानात ते!’ यातले अनेक जण तर ‘हौशी’ विमान प्रवासी असतात. पण बंगळुरू विमानतळावर एका विमानातल्या प्रवाशांना विमानात बसण्याची भिती काय असते? याचा काळजात धडकी भरवण्याइतपत प्रत्यय आला. कारण सामान्यपणे विमानं विमानतळावरच्या धावपट्टीवर लँड होतात. पण बंगळुरूमध्ये उतरणारं हे विमान चक्क बाजूच्या शेतात लँड झालं! आता जिथं गुळगुळीत धावपट्टी असायला हवी होती, तिथे शेतातली मातीची ढेकळं लागली, तर आत विमानात जे व्हायचं तेच झालं!

धावपट्टीवरून विमान थेट उतरलं गवतात!

नागपूरहून बंगळुरूच्या दिशेने जाणारं G8-811 हे विमान बंगळुरूला पोहोचलं, तेव्हा विमानतळावर खराब हवामान असल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. पण हे लक्षात येईपर्यंत वैमानिकानं विमान बरंच खाली आणलं होतं. त्याचदरम्यान त्याला एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमान लँड न करता परत फिरवून पुढच्या संदेशाची वाट पाहण्यास सांगण्यात आलं. पण तोपर्यंत विमान धावपट्टीवर उतरलं आणि परत फिरण्यासाठी वैमानिकाला पुढचं काहीच दिसेनासं झालं. त्यामुळे वैमानिकानं परत फिरण्यासाठी डावीकडे वळताच विमान थेट धावपट्टीवरून बाजूच्या गवतात उतरलं!

aircraft wheel
विमानाच्या चाकांना पहिल्यांदाच शेतातली माती आणि गवत लागल्याचं पाहायला मिळालं!

विमानात बसलोय की ट्रकमध्ये?

पुढची काही मिनिटं आणि काही मीटर अंतरापर्यंत गवतातून घासत विमान पुढेपर्यंत गेलं आणि अखेर वैमानिकाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा हवेत झेपावलं. यावेळी मात्र वैमानिकाने अचूकपणे विमानाचं उड्डाण गवतावरून केलं. दरम्यान, बंगळुरू विमानतळावरचं वातावरण लँडिंगसाठी योग्य नसल्याचं सांगत एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाला हैदराबादच्या दिशेने जाण्याचा संदेश दिला. हैदराबादला जेव्हा विमान उतरलं, तेव्हा विमानाच्या चाकांमध्ये गवत आणि माती अडकल्याचं दिसून आलं. सुदैवाने विमानात बसलेल्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, मातीच्या ढेकळांवरून विमान एखाद्या ट्रकसारखे धक्के खात जेव्हा गेलं, तेव्हा मात्र प्रवाशांच्या पोटात नक्कीच भितीने गोळा आला असणार!


Video: मांजरीने वाचवला चिमुरड्याचा जीव!

दरम्यान, या प्रकरणी डीसीसीएने पुढील चौकशी सुरू केली आहे. मात्र, गो एअरकडून अद्याप या प्रकरणी खुलासा आलेला नाही.