घरदेश-विदेशसंघाच्या गोळवलकर गुरुजींचे 'बंच ऑफ थॉट्स' कालबाह्य?

संघाच्या गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’ कालबाह्य?

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागच्या काही काळापासून स्वतःबद्दलचे संभ्रम दूर करुन त्याला व्यापक रुप देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच संघाने “भारत का भविष्य: आरएसएस का दृष्टीकोण” या नावाने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा काल (बुधवार) शेवटचा दिवस होता. दिल्लीतील विज्ञान भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाशी निगडीत अनेक संभ्रम तोडण्याचा प्रयत्न करत संघ नवे पायंडे पाडत असल्याचे सुचवले.

गोळवलकर गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तृतीय सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ असे दिर्घकाळ संघचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. याच काळात त्यांनी ‘बंच ऑफ थॉट्स’ हे पुस्तक लिहून संघाची विचारधारा आणि कार्यप्रणालीवर मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. आजपर्यंत बंच ऑफ थॉट्स हे पुस्तक प्रत्येक संघकार्यकर्त्यासाठी आणि संघ जाणून घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज मानले जात होते. मात्र काल पहिल्यांदाच मोहन भागवत यांनी बंच ऑफ थॉट्समधील काही विचार कालबाह्य झाले असून संघ आता त्या विचारांशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणादरम्यान त्यांना गोळवलकर गुरुजी यांनी मुस्लिम समाजाबद्दल व्यक्त केलेल्या विचारांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना भागवत म्हणाले की, गोळवलकर यांनी व्यक्त केलेले विचार हे त्याकाळच्या परिस्थितीवर आधारीत होते. मात्र आता ते कालबाह्य झाले असून त्याची आज गरज नसल्याचे स्पष्टीकरण भागवत यांनी दिले. भागवत यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले असेल.

भागवत म्हणाले की, “गोळवलकर यांचे भाषणे त्या त्या वेळच्या परिस्थितीचा परिपाक होते. ते शाश्वत नाहीत. संघ हा बंदिस्त विचारसरणीचे संघटन नाही. वेळेनुसार आम्ही आमची विचारसरणी बदलत असतो. वेळेनुसार बदल करण्याची परवानगी आम्हाला पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्याकडूनच मिळाली आहे. यामुळे आम्ही संघात वेळोवेळी बदल करण्यासाठी मोकळे आहोत.”

- Advertisement -

गोळवलकर गुरुजींनी बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदाय हिंदु समाजासाठी धोकादायक असल्याचे सांगितले होते. यावर भागवत यांनी खुलासा करत म्हटले आहे की, आम्ही मुक्त भारत नाही तर युक्त भारतसाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हिंदु वगळून इतर कोणत्याही समाजाला धोक्याच्या स्वरुपात पाहत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -