ऑफिसमध्ये राजकारणावर गप्पा कराल तर खबरदार; गुगलचा कर्मचाऱ्यांना आदेश!

ऑफिसमध्ये राजकारणावर किंवा कामाव्यतिरिक्तच्या कोणत्याही मुद्द्यावर आक्रमकपणे चर्चा करणं ताबडतोब बंद करा, असा आदेश गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Mumbai
google-location_tracking_history
गुगल

राजकारण हे सर्वव्यापी आहे असं म्हटलं जातं. अगदी गल्लीच्या टोकावर असलेला चहाचा ठेला असो किंवा मग संसदेचं सभागृह…राजकीय चर्चा या सर्वव्यापी आणि म्हणूनच अपरिहार्य असतात. पण आता ‘बाहेर काहीही करा, पण ऑफिसमध्ये राजकीय चर्चा करू नका’ असा फतवाच गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काढला आहे. कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमध्ये कामाच्या ठिकाणी राजकीय चर्चा करू नये, असा नियम अंतर्भूत करण्यात आला आहे. या नियमामुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्य आणि धक्का देखील बसला असेल, यात शंका नाही!

‘ज्यासाठी नोकरी दिलीये, ते काम करा’

‘कामाच्या ठिकाणी माहिती आणि कल्पनांची देवाण-घेवाण केली, तर त्याचा फायदा ब्रॅण्डसाठी होतो. पण दिवसाच्या कामामध्ये व्यत्यय आणून राजकारणावर किंवा सद्य घडामोडींवर चर्चा केल्याने त्याचा काहीही फायदा ब्रॅण्ड उभा करण्यात होत नाही’ असं या नव्या नियमावलीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘आपल्याला ज्या कामासाठी नोकरीवर घेण्यात आलं आहे, ते काम करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. कामाव्यतिरिक्तच्या गोष्टींवर कामासाठीचा वेळ खर्ची घालणं हे आपलं कर्तव्य अजिबात नाही’, असं या नियमावलीमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.


हेही वाचा – आता गुगल मॅप्स सांगणार पब्लिक टॉयलेट कुठे आहे?

‘जबाबदारीने वागा’

‘ऑफिसमध्ये असताना किंवा ऑफिसमधल्या अंतर्गत संवाद माध्यमांचा वापर करताना सर्वच कर्मचाऱ्यांनी जबाबदार, सहकार्याचं आणि विचारपूर्वक वर्तन ठेवावं’, असं देखील या नियमावलीमध्ये म्हटलं आहे. सामान्यपणे गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्याचं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं, असं म्हणतात. पण या नव्या नियमावलीमुळे मात्र या समजुतीला छेद गेल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ही नियमावली वाचून इतरही संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘असं काही आपल्याकडे झालं तर काय?’ असा प्रश्न सतावू लागला आहे.