छोट्या शेतकऱ्यांना आणि स्टार्टअपसाठी मिळणार सहज कर्ज; RBI ने नियम केले शिथिल

Great relief to small farmers and startups rbi expands priority sector lending categories

कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) छोट्या शेतकऱ्यांना आणि ज्यांना स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने अग्रक्रम क्षेत्र कर्ज श्रेणीची व्याप्ती वाढविली आहे. बँक कर्जाच्या प्राथमिक श्रेणीत स्टार्ट-अपचादेखील समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत स्टार्ट अपला ५० कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. याशिवाय सौरऊर्जा प्रकल्प आणि बायोगॅस प्लांटसाठी शेतकऱ्यांना कर्जदेखील देण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) शुक्रवारी सांगितलं की अग्रक्रम क्षेत्र कर्जाच्या (PSL) मार्गदर्शक तत्त्वांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, उदयोन्मुख राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने त्यामध्ये सुधारणा केली गेली आहे. केंद्रीय बँकेने सांगितलं की सर्व भागधारकांशी चर्चा केल्यानंतर आता सर्वसमावेशक विकासावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, “सुधारित पीएसएल मार्गदर्शक तत्त्वांमुळे वंचित भागातील पतपुरवठा वाढेल. यातून अल्प व अल्पभूधारक शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांना अधिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसंच, अक्षय ऊर्जा, आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील कर्जातही वाढ केली जाईल.” आता बँकांकडून पीएसएलमध्ये स्टार्ट अपसाठी ५० कोटी रुपयांपर्यंतचा वित्तपुरवठा उपलब्ध होऊ शकेल.