कॉलेज, विद्यापीठांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

मिशन बिगिन अंतर्गत राज्यातील हळूहळू प्रत्येक क्षेत्र सुरू करण्यात येत आहे. त्यातच आता कॉलेज व विद्यापीठे सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

UGC
UGC

मिशन बिगिन अंतर्गत राज्यातील हळूहळू प्रत्येक क्षेत्र सुरू करण्यात येत आहे. त्यातच आता कॉलेज व विद्यापीठे सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र या सूचना जारी करताना यूजीसीने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कॉलेज व शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावे असे निर्देशही विद्यापीठांना दिले आहेत. तसेच कॉलेजात प्रवेश करण्यापूर्वी आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाइलमध्ये असणे आवश्यक असणार आहे.

१६ मार्चपासून देशातील कॉलेज बंद झाली आहेत. या दरम्यान कॉलेजांमधील वर्ग ऑनलाईन चालवण्यात येत आहेत. सध्या केंद्र सरकारकडून देशामध्ये टप्प्याटप्याने विविध क्षेत्रांना परवानगी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता कॉलेज व विद्यापीठेही सुरू करण्यात यावीत, अशा सूचना यूजीसीकडून देण्यात आल्या आहेत. मात्र कॉलेज सुरू करताना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरू करण्यात यावीत. जे विभाग कंटन्मेंट झोन नाहीत अशा विभागांतील कॉलेजे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने या मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे.

कॉलेज सुरू करण्यापूर्वी कॅम्पसचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थी, कर्मचारी यांना मास्क लावणे बंधनकारक असेल. प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाले तरी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे असेही यात स्पष्ट केले आहे. जेथे शक्य आहे तेथे निवासी कॉलेजांमध्ये हॉस्टेल सुरू करण्यासही आयोगाने परवानगी दिली आहे. एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहण्यास परवानगी देण्यात यावी असेही मार्गदर्शक सुचनेत सांगण्यात आले आहे. कॉलेज सुरू केल्यावर जर कोणत्या विद्यार्थ्याला करोनाची लक्षणे जाणवली तर त्याचे तातडीने विलगीकरण करण्यात येईल अशी सुविधाही असावी असेही यात सांगण्यात आले आहे. तसेच संस्थांनी सरकारी रुग्णालयांशी संलग्न होऊन कॉलेजांतील विद्यार्थी, कर्मचार्‍यांना तातडीने उपचार मिळतील अशी सुविधा उपलब्ध करावी असेही यात सांगण्यात आले आहे. राज्य सरकारांनी या सूचनांच्या आधारे संपूर्ण राज्यातील शिक्षण संस्थांना एकसमान नियम करावेत असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या सूचना

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूटांचे अंतर असावे.
  • थोड्यावेळाने साबणाने ४० ते ६० सेकंद हात धुवावे. तर सॅनिटायझरने २० सेकंद हात धुवावे.
  • संकुलात थुंकण्यास सक्त मनाई करावी.
  • दर काही तासांनी संकुलातील वरांडे, स्वच्छतागृहे सोडियम हायपोक्लोराइडने स्वच्छ करावेत.