घरदेश-विदेशदीपिकाचं मुंडकं उडवण्याची भाषा करणारे अजूनही भाजपमध्येच!

दीपिकाचं मुंडकं उडवण्याची भाषा करणारे अजूनही भाजपमध्येच!

Subscribe

‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते आणि त्यातील कलाकारांचं मुंडकं छाटणाऱ्याला १० कोटी इनाम देऊ अशी घोषणा करणाऱ्या भाजपच्या हरयाणातील नेते सूरज पाल अमू यांचं भाजपमधलं स्थान अबाधित राहिलं आहे. वर्षभरापूर्वी वाद सुरू असताना अमू यांचा राजीनामा घेणाऱ्या हरयाणा भाजपने तो स्वीकारलाच नसल्याचं सोमवारी स्पष्ट झालं आहे.

‘पद्मावत’ सिनेमा आणि त्यातून निर्माण झालेला वाद आता वर्षभराच्या खंडानंतर शांत झाला आहे. मात्र, त्यात गुंतलेल्या लोकांची नावं अजूनही चर्चेत येत आहे. नुकतंच हरयाणा भाजपमधले पदाधिकारी सूरज पाल अमू यांचं नाव चर्चेत आलं आहे. ‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते आणि कलाकारांचं डोकं उडवणाऱ्याला १० कोटींचा इनाम देण्याची घोषणा सूरज पाल अमू यांनी केली होती. यानंतर मोठा गदारोळ माजला होता. सूरज पाल अमू यांना हरयाणा भाजपकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यावर अमू यांनी राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यांचा राजीनामा नाकारत भाजपने त्यांना पक्षात कायम ठेवलं आहे.

‘पद्मावत’वरून केलं होतं धक्कादायक विधान

‘पद्मावत’ सिनेमामध्ये राणी पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा, तसेच राजपूत समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा अनेक राजपूत संघटनांनी केला होता. यावर मोठा वाद निर्माण झाला होता. राजस्थानमध्ये याप्रकरणात काही राजपूत संघटनेच्या लोकांनी एका व्यक्तीला ठार मारून त्याला गावच्या वेशीवर लटकवल्याची घटना देखील समोर आली होती. त्यामुळे हिंसक बनलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित करण्याला मोठा विरोध करण्यात आला. त्यातच हरयाणा भाजपचे मुख्य माध्यम समन्वयक सूरज पाल अमू यांनी एक धक्कादायक आवाहन केलं. ‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते आणि त्यातील कलाकारांचं डोकं छाटणाऱ्यांना माझ्याकडून १० कोटींचा इनाम दिला जाईल अशी जाहीर घोषणाच त्यांनी केली.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – ‘पद्मावत’नंतर सलमान खानच्या ‘लवरात्री’लाही विरोध


अमूंची पुन्हा पक्षात घरवापसी

अमू यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेता हरयाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांनी सूरज पाल अमू यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अमू यांनी थेट त्यांच्या पक्षतील सर्व पदांचाच राजीनामा दिला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराच्या ८ महिन्यांनंतर सोमवारी हरयाणा भाजपने त्यांचा राजीनामा नाकारला आहे. ‘ही माझ्यासाठी घरवापसीच आहे’, अशी प्रतिक्रिया सूरज पाल अमू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे भाजपकडून अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त करणाऱ्यांना अभय दिलं जातंय का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -