केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोना रुग्णांसाठी नवीन प्रोटॉकॉल

health ministry issue new covid-19 protocol

भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोविड-१९ ची बिघडणारी परिस्थिती पाहता आरोग्य मंत्रालयाने ‘पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल’ जारी केला आहे. संबंधित प्रोटोकॉलमध्ये रुग्णांच्या रिकव्हरी आणि समुदाय स्तरावर विषाणूचा प्रसार कसा कमी करावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.

घरात क्वारंटाईन होऊन बरे झालेल्या रुग्णांच्या प्रोटोकॉलमध्ये बर्‍याच महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. प्रोटोकॉलनुसार, असे रुग्ण मास्क, हात स्वच्छ आणि श्वसन स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. तसंच सामाजिक अंतराच्या नियमांचे गांभीर्याने पालन करावं आणि पुरेसं गरम पाणी प्या. आयुष मंत्रालयाची औषधे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरली जाऊ शकतात. आरोग्याची साथ योग्य प्रकारे मिळत असेल तर घरातील कामे नियमितपणे करावीत. कार्यालयीन काम हळू हळू सुरू करा. यावेळी लोकांना हलका व्यायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

याशिवाय आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि दररोज योग, प्राणायाम आणि ध्यान साधना करा. यामध्ये श्वासोच्छवासाच्या व्यायाम देखील करा, असं देखील सुचवलं आहे. शारीरिक क्षमतेनुसार, दररोज मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी चालायला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपला पौष्टिक आहार संतुलित करा. जे ताजं शिजलेलं आणि सहज पचवता येईल असं अन्न घ्यावं. पुरेशी झोप आणि विश्रांतीसुद्धा घ्या. मद्य किंवा धूम्रपान करू नका. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तातील साखर (जर आपल्याला मधुमेह असेल तर) आणि खासकरुन नाडी ऑक्सिमेस्ट्रीबद्दल माहिती घेत राहा.

कोरडा खोकला आणि घसा खवखवल्यास गरम पाण्याने मिठाच्या गुळण्या करा आणि वाफ घ्या. वाफ घेण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर करावा. खोकला असेल तर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच औषधोपचार घ्या किंवा आयुष मंत्रालयाच्या पात्र चिकित्सकांचा सल्ला घ्या. तीव्र ताप, श्वास लागणे, छातीत दुखणे आणि अशक्तपणा यासारख्या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष द्या. नवीन प्रोटोकॉलमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या टिप्सचादेखील उल्लेख आहे. यासाठी आयुष मंत्रालयाची औषधे वापरता येतील.