त्याग, बलिदानाचे प्रतिक म्हणून साजरी करतात बकरी ईद

बकरी ईद म्हणजे कुर्बानीचा सण

Mumbai
बकरी ईद

प्रेम, त्याग आणि बलिदानाचे प्रतिक म्हणून बकरी ईद संपुर्ण देशभरात साजरी केली जाते. या बकरी ईदला ‘ईद उल अजहा’ किंवा ‘ईद उल जुहा’ असेही म्हणतात. मुस्लिम बांधवांमध्ये ईद-उल-अज्हाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाहसाठी कुर्बानी द्यावी लागते.

विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देतात

इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचा सांभाळ करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतर तो कुर्बानीसाठी अल्लाहच्या नावे कापण्याची प्रथा आहे. कुर्बान केलेल्या बकऱ्याच्या मांसाचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियाच्या घरात देण्याची प्रथा आहे. सकाळी करण्यात येणाऱ्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी देण्यात येते.

मुस्लिम समाजात बकरी ईद हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुस्लिम कॅलेंडरनुसार धू असं हिज्जाच्या १० व्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. ही तारीख रमजानचा महिना संपल्यावर जवळपास ७० दिवसांनी येते. रमजानच्या एक दिवस नंतर ईद उल फिकर म्हणजे मिठी ईद साजरी केली जाते. ईद उल फिकर आणि ईद उल अजहा यांच्या जवळपास अडीच महिन्यांचा फरक असतो.

बकरी ईद म्हणजे कुर्बानीचा सण असे मानण्यात येते. या दिवशी आपल्या सर्वात आवडत्या वस्तूची किंवा जनावराची कुर्बानी दिली जाते.

…म्हणून साजरी करतात बकरी ईद

हजरत इब्राहिम यांच्यामुळे अल्लाहला कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. अल्लाहने इब्राहिम यांना सर्वात आवडती वस्तू कुर्बान करण्यास सांगितली. तेव्हा ते एकुलता एक मुलगा कुर्बान करण्यास तयार झाले होते. कुर्बानी द्यायच्या वेळी त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. कुर्बानी दिल्यानंतर त्यांनी पट्टी काढली तेव्हा मुलाच्या जागी दुंबा म्हणजे बकरी असल्याचे त्यांना जाणवले. अल्लाहने त्यांच्या मुलाच्या जागी दुंबाला पाठवले अशी मान्यता आहे. तेव्हापासून कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली.

इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहीम खुदाच्या आदेशाने खुदाच्या मार्गावर आपला मुलगा हजरत इस्माइलची कुर्बानी द्यायला जात असताना अल्लाहने हजरत इब्राहीमच्या प्रामाणिक पणावर प्रसन्न होऊन त्याच्या मुलाचे प्राण माफ केले. मुलाच्या कुर्बानीऐवजी तेथे असलेल्या एका बकऱ्याची कुर्बानी दिली गेली. याच आधारे ईद उल अजहा किंवा ईद उल जुहा साजरा केला जातो.