माझी छाती फाडली, तरी मोदीच दिसतील

मी मोदींचा हनुमान

paswan modi

बिहार निवडणुकीत मला पक्षाच्या कॅम्पेनमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याची गरज नाही. माझ्या ह्दयातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणूनच मला आगामी निवडणुकीत मोदींचा फोटो वापरण्याची गरज नाही. ते नेहमीच माझ्या ह्दयात राहतात, मी त्यांचा हनुमान आहे. गरज भासल्यास मी माझी छाती फाडने आणि ते दाखवेन असे वक्तव्य लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) प्रमुख चिराग पासवान यांनी केले आहे. एनडीएमधून बाहेर पडत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे.

भाजप नेता सुशील मोदी यांनी मोदींचा फोटो वापरण्यासाठी मज्जाव करताना निवडणुक आयोगाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे आता बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. चिराग पासवान यांनी दुसरीकडे स्पष्ट केले आहे की आम्ही भाजपविरोधात उमेदवार देणार नाही, तसेच भाजपचा नेताच यापुढचा बिहारचा मुख्यमंत्री होईल असे स्पष्ट केले आहे. मला पंतप्रधान यांच्यावर पुर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की १० नोव्हेंबर नंतर बीजेपी आणि एलजेपी एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. चिराग पासवान यांनी जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांना सातत्याने टार्गेट केले आहे. नितीश कुमार यांनीही नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरावा असा सल्ला चिराग पासवान यांना दिला होता. आमचे मन हे पंतप्रधानांसोबत जुळले आहे. आमचे पंतप्रधानांसोबत ह्दयाचे नाते आहे.

नॅशनल डेमोक्रॅडिट अलायन्स (एनडीए)मधून बाहेर पडण्याचा निर्णय एलजेपीने घेतला आहे. बिहार निवडणुका येत्या दिवसांमध्ये तीन टप्प्यात आहेत. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात निवडणुका होतील. तर मतमोजणीची प्रक्रिया ही १० नोव्हेंबर होईल.