“करोनाचा हाहा:कार सुरू राहिला तर मे पर्यंत ३० हजार मृत्यू”

New Delhi
cornavirus death troll increase
चीन मधील कोरोना बाधितांवर उपचार करतानाचे चित्र

भारतात करोना विषाणूंचे रुग्ण ज्यागतीने वाढत आहेत, तो वेग चिंताजनक आहे. दी प्रींट या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, सध्याच्या वेगाने मे महिन्यापर्यंत करोना विषाणू देशात ३० हजार बळी घेईह. तर करोना रुग्णांची संख्या इतकी होईल की देशाच्या कुठल्याही हाॅस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी एकही बेड शिल्लक राहणार नाही.
दी प्रींट ने दावा केल्यानुसार, त्यांच्याकडे अशी आकडेवारी आहे की, त्यामुळे करोना संसर्ग भारतासारख्या देशात जेथे वैद्यकीय सुविधांची अगोदरच वाणवा आहे, तेथे हाहाकार माजवू शकतो.

भारतात करोनाच्या रुग्णांचा आकडा ५० पर्यंत पोहचण्यासाठी ४० दिवस लागले. मात्र त्यानंतर करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ४० दिवसांनंतर पुढे फक्त पाच दिवसांतच करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहचली. त्यानंतर फक्त तीन दिवसांत करोनाग्रस्त रुग्ण देशात १५० वर पोहचले आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यांच्या संख्येने २०० चा आकडा पार केला. आज करोनाग्रस्त ५०० च्या पुढे गेले आहेत. त्यामुळे कोणाला खरे वाटो अथवा नाही, भारत जगातीह अमेरिकासारख्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे जेथे प्रत्येक दोन दिवसांनंतर करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होत आहे.

दक्षिण कोरियानंतर दहा दिवसांनी इटलीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर इटलीत २० दिवसांपर्यंत फक्त १० करोनाग्रस्त रुग्ण होते. तर दक्षिण कोरियात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र फक्त एक आठवड्याच्या कालावधीत इटलीतील करोनाग्रस्त रुग्ण भीतीदायक झपाट्याने वाढले आहेत. एक आठवड्याच्या कालावधीत दक्षिण कोरियाचा करोना आलेख स्थीर झाला. मात्र इटलीतील करोनाग्रस्त रुग्ण झपाट्याने वाढत होते. त्यामुळे इटलीच्या आरोग्यसेवेवर कमालीचा ताण आला आहे. भारताला आपला करोना आलेख, जो सध्या इटलीच्या मार्गावर आहे, स्थीर करायचा असेल तर सामाजिक विलगीकरणाची प्रक्रिया अधिक कठोरपणे राबवावी लागणार आहे. त्याची घोषणा भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांनी केलेली आहे, पण लाॅकडाऊन अधिक कठोरपणे करून सामाजिक विलगीकरण साधावेच लागणार आहे.

दी प्रींटने दिलेल्या बातमीनुसार, आता भारताला रुग्ण चाचणीचे प्रमाण वाढवावे लागेल. तरच देशातील खरे करोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण कळेल. मोदी सरकारने मागील शुक्रवारी त्याची घोषणा केलेलीच आहे. ज्यांना श्वसनाचा त्रास होतोय अथवा जे परदेशात जाऊन आले आहेत, त्यांची सर्वांची करोना चाचणी करण्याचे आदेश मोदी सरकारने दिलेले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर ३.४ टक्के असल्याचे म्हटले आहे. त्यादरानुसार, भारतात मे महिन्याच्या अखेरपर्यंत १० लाख करोनाचे रुग्ण असतील आणि ३० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला असेल, असा दावा दी प्रींट या वेबसाईटने केला आहे. हे ठोबळ अनुमान आहे. जीव-सांख्यिकी गटाने निष्कर्ष माॅडेल वापरून अनुमान काढला आहे की, करोनाग्रस्तांची संख्या त्यापेक्षा जास्त असेल. १५ मेपर्यंत ती १० लाख झालेली असेल. एका दिवसात वाढणार्या करोनाग्रस्तांची संख्या पाहता आणि मोठ्या प्रमाणात चाचणी होण्याची अक्षमता लक्षात घेता, देशात प्रत्यक्ष उघड झालेले करोनाग्रस्त रुग्णांपेक्षा ज्यांना करोना झालाय पण ते अद्याप उघडकीस आलेले नाही, अशांची संख्या उघडकीस आलेल्या करोनाग्रस्तांपेक्षा आठपटीने जास्त असण्याची शक्यता आहे.

दी प्रींटने दावा केला आहे की, साॅफ्टवेअर उद्योजक मयांक छाब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशात पन्नास लाखांपेक्षा जास्त करोनाग्रस्त असतील आणि १.७ लाख रुग्ण मृत्युमुखी पडलेले असतील. आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची गंभीरता अद्याप अनेकांना कळलेली नाही. पण ही आकडेवारी भयानक आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात जेथे बहुसंख्य कामगारांना नोकरी नाही. त्यामुळे केरळ सरकारने जाहीर केलेल्या काॅम्पेन्सेशन पॅकेजच्या धर्तीवर संपूर्ण देशात काॅम्पेन्सेशन पॅकेज महत्त्वाचे आहे.

वैद्यकीय सेवांची वाणवा

आपल्या देशात २०१७ च्या आकडेवारीनुसार, प्रत्येक एक हजार रुग्णांच्यामागे फक्त ०.५ बेड आहेत. त्यामुळे भारतातील आरोग्यसेवा यंत्रणांवर आगामी काळात मोठा ताण पडणार आहे. करोना रुग्ण वाढीच्या सध्याच्या दरानुसार, जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत भारतातील हाॅस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होणार नाहीत. भारतातील हाॅस्पिटलमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या बेडची संख्या आणि करोनाग्रस्तांचा झपाट्याने वाढणारा आकडा लक्षात घेता एप्रिलपर्यंत देशातील हाॅस्पिटलमध्ये करोनाग्रस्तांना बेडच मिळणार नाहीत, असे मयांक छाब्रा यांनी सांगितल्याचे दी प्रींटने आपल्या बातमीत म्हटले आहे.
भारतातील हाॅस्पिटलमधील आयसीयूतील बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या अधिकृतरित्या समजलेली नाही. पण ती कमी आहे, असे म्हटले जाते. देशात आयसीयूतील बेडची संख्या ७० हजार आहे. १० पैकी एका करोनाग्रस्ताला आयसीयूमध्ये ठेवले तरीही मे अखेरपर्यंत देशातील सर्व आयसीयू बेड भरलेले असतील.

श्रीमंत देश करोनाविरोधात झगडत आहेत. इटलीतील डाॅक्टर सध्या कोणाला व्हेंटिलेटर द्यायचे कोणाला नाही या धर्म संकटात आहेत. तेथे वैद्यकीय पुरवठ्याचे उत्पादन करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. अमेरिका त्या दिशेने वाटचाल करत आहे. कळलेल्या माहितीनुसार, भारतात आजच्या घडीला व्हेंटिलेटरची संख्या फक्त ४००० आहे. मोदी सरकारने त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

काही राज्यात आरोग्य सेवांची भयावह स्थिती

देशातील काही राज्यांमधील आरोग्य सेवेची स्थिती सध्या फारशी चांगली नाही. बिहारमध्ये १ लाख लोकांसाठी फक्त एक सरकारी हाॅस्पिटल आहे. तर गोव्यात २० हाॅस्पिटल आहेत. छत्तीसगडमध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्ट डाॅक्टरांच्या ७१ टक्के पदे रिक्त आहेत. तर उत्तर प्रदेशात क्षयरोग रुग्णांना मिळणार्या वैद्यकीय सेवांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण फक्त ६४ टक्के आहे. केंद्रातील मोदी सरकार या राज्यांना कशी मदत करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


रुक्मिणी एस – (लेखिका चेन्नईस्थित डाटा पत्रकार आहे. बातमीतील मते त्यांची वैयक्तिक आहेत)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here