घरदेश-विदेश...तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हरू शकतात निवडणूक ?

…तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हरू शकतात निवडणूक ?

Subscribe

वाराणसीतून प्रियांका गांधी लोकसभेसाठी उभ्या राहिल्या तर निवडणुकीची गणिते बदलू शकतात. मात्र त्यासाठी त्यांनी तेथून निवडणूक लढविण्याचा गांभिर्याने विचार करायला हवा.

रायबरेलीला प्रचार करत असताना कॉग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना तेथील एका कार्यकर्त्याने ‘ तुम्ही रायबरेलीतून निवडणूक लढवा’ असा आग्रह धरला होता. त्यावर प्रियांका गांधी यांनी वाराणसी का नको? असे उत्तर हलक्या फुलक्या ढबात दिले. जर खरेच प्रियांका गांधी वाराणसी येथून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या तर काय होईल? त्या विद्यमान खासदार आणि पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांचा सामना सक्षमपणे करू शकतील का? तसेच कॉँग्रेसही या जागेकडे गांभिर्याने बघेल का? तसे झाले तर लोकसभा निवडणुकीतील तो सर्वात चर्चेचा विषय ठरेल मात्र कॉँग्रेसने मनावर घेतले पाहिजे आणि तेथे सपा-बसपानेही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ही लढत रंगतदार होऊ शकेल.

मोदी विरूद्ध प्रियांका गांधी यांचा वाराणसीतील सामना झाला, तर तेथील मतदार, जातीय समिकरणे, मागच्या निवडणुकीतील कामगिरी आणि मिळालेल्या मतांची संख्या यांचा विचार करायला हवा. 2014 मध्ये वाराणसीमध्ये मोदीमय वातावरण होते, पण दरम्यानच्या 5 वर्षांच्या काळात गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. नोटबंदी, जीएसटीसह अनेक गोष्टींचा प्रभाव येथील जनजीवनावर पडला आहे. तसेच सपा आणि बसपाच्या एकत्र येण्यामुळे येथील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

- Advertisement -

2014मध्ये कसे होते मतांचे गणित
2014च्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून 5,81,022 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांना 2,09,238 मते पडली होती. म्हणजेच मोदींना जवळच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा तब्बल 3 लाख 77 हजार मतांची आघाडी मिळाली होती. याशिवाय त्यावेळचे कॉँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 75,614, तर बसपाच्या उमेदवाराला 60 हजार 579 मते मिळाली होती. समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला 45291 इतकी मते मिळाली होती. कॉँग्रेस, सपा आणि बसपा यांची मते एकत्र केल्यास ती संख्या होते 3 लाख 90 हजार 722. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयातील मतांच्या फरकापेक्षा थोडा जास्त. समजा कॉँग्रेसने या ठिकाणहून जागा लढविली, तर सपा आणि बसपा रायबरेली आणि अमेठी प्रमाणेच येथूनही आपला उमेदवार देणार नसेल, तरच ही लढाई अटीतटीची होऊ शकेल अशी शक्यता एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तांतात वर्तविण्यात आली आहे.

वाराणसीतील सामाजिक गणित कसे आहे?
वाराणसीमध्ये साधारणत: सव्वा तीन लाख व्यापारी मतदार आहेत. हे सर्वचे सर्व भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. नोटबंदी आणि जीएसटीनंतर झालेले दुष्परिणाम प्रभावीपणे कॉंग्रेसने मांडले, तर हा मतदार भाजपाच्या हातातून कॉँग्रेसच्या हाताला लागू शकतो. याशिवाय या मतदारसंघात अडीच लाख ब्राह्मण मतदार आहेत. विश्वनाथ कॉरिडॉर होताना सर्वात जास्त घरे ब्राह्मणांचीच प्रभावित झाली आहेत. याशिवाय सुधारित एससी/एसटी बिलबद्दलही या वर्गात नाराजी आहे. तिला जर हवा दिली, तर कॉँग्रेसकडे भाजपाचा हा मतदारवर्ग वळू शकतो.

- Advertisement -

याशिवाय यादवांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. हा मतदारही भाजपालाच मतदान करत आला आहे. मात्र सपामुळे ही मते कॉँग्रेसकडे वळू शकतात. याशिवाय मुस्लीम मतदारांची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. भाजपाला जो प्रभावीपणे टक्कर देईल, त्यालाच हा समाज मतदान करतो. याशिवाय भूमिहार सव्वालाख, राजपूत 1 लाख, पटेल 2 लाख, चौरसिया आणि दलित प्रत्येकी 80 हजार, अन्य मागास वर्गिय 70 हजार असा मतदार विभागला गेलेला आहे. यांच्या मतदानाच्या टक्केवारीत जरा सुद्धा इकडे तिकडे झालं, तरी निवडणुकीचा निकाल बदलू शकतो.

अर्थात या सर्वांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत केलेल्या विकासकामांचाही प्रभाव पडणार आहे. तो ही विचारात घ्यावा लागेल. मात्र तरीही प्रियांका गांधी वाराणसीतून उभ्या जरी राहिल्या तरी निवडणूक निकालापूर्वीच उत्तरप्रदेशमध्ये कॉँग्रेस पक्ष एक मोठा संदेश देण्यात सफल होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -