राहुल गांधींना मजामस्तीसाठी काश्मीरात जायचंय? आम्ही सोय करतो – संजय राऊत

Mumbai
Sanjay Raut Rahul Gandhi
संजय राऊत राहूल गांधी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या न होऊ शकलेल्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली असून त्यांना परत पाठविल्याबद्दल काश्मीर प्रशासनाचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांतील १२ जणांचे शिष्टमंडळ शनिवारी काश्मीरमध्ये गेले होते. मात्र काश्मीर पोलीस प्रशासनाने त्यांना श्रीनगर विमानतळावरून माघारी धाडले. “राहुल गांधींना जर पर्यटन आणि मजामस्तीसाठी जम्मू आणि काश्मीरला जायचे असेल तर आम्ही पर्यटन विभागाला विनंती करुन तशी सोय करायला लावतो.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे सीताराम येचुरी, शरद यादव, मनोज झा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, तिरुची शिवा आणि डी राजा असा ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. कलम ३७० काढून टाकल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ काश्मीरला गेले होते. शनिवारी हे सर्व नेते दिल्ली विमानतळावरून निघाले होते. “काश्मीरमध्ये जाऊन फक्त परिस्थितीचा आढावा घ्या, कोणताही राजकीय हस्तक्षेप करु नका”, असा सल्ला सर्व नेत्यांना दिल्ली विमानतळावरच देण्यात आला होता.

संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “कलम ३७० हटवून कुणाचे स्वप्न पुर्ण झाले हे मला माहीत नाही. पण कलम ३७० रद्द व्हावे, ही सर्व भारतीयांची इच्छा होती. हे कलम काढून टाकल्याबद्दल मी गृहमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो.”

जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच राहुल गांधी यांना काश्मीरमध्ये येऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र श्रीनगर विमानतळावरच पोहोचताच तेथील पोलिस प्रशासनाने सुरक्षेचे कारण पुढे करत सर्व नेत्यांना माघारी धाडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here