फेब्रुवारीमध्ये होणार ‘गेट २०२१’ परीक्षा

आयआयटी मुंबईकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नॅशनल कोऑर्डिनेशन बोर्डच्या वतीने दरवर्षी इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ही कम्प्युटर बेस्ड् टेस्ट (सीबीटी) अ‍ॅप्टिट्यूड परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि देशातील सात आयआयटी संस्थांमार्फत घेण्यात येते.

आयआयटी मुंबईतर्फे यंदा घेण्यात येणारी ‘गेट २०२१’ ही परीक्षा ५, ६, ७, १२, १३ ,१४ फेब्रुवारीला सकाळ आणि दुपार अशा २ सत्रांत होणार आहे. यंदा या परीक्षेत एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स हा पेपर इकोनॉमिक्स, इंग्लिश, फिलॉसोफी, सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी या विषयांतर्गत देता येणार आहे. यंदा २७ पेपर असून ते वस्तूनिष्ठ प्रश्नांवर आधारित असणार आहेत. या परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नसली तरी नवी शैक्षणिक धोरणानुसार सध्या पदवीच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत असलेला किंवा इंजिनियरिंग, टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समधून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. परीक्षेसाठीची नोंदणी १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन करायची आहे.

परीक्षाची माहिती पुस्तिका, पोस्टर आणि संकेतस्थळाचे अनावरण आयआयटीचे संचालक शुभाशीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांना उत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले. तसेच गेट २०२१ परीक्षा आयोजित करण्यासाठी मेहनत घेणार्‍या आयआयटी मुंबईच्या टीमचेही अभिनंदन केले.