चीनने घुसखोरी केली तर चोख उत्तर मिळेल; भारताचा इशारा

india warns china

वास्तविक नियंत्रण रेषेवरुन भारत-चीन तणाव अद्याप कायम आहे. चीनच्या कुरापत्या सुरुच असल्यामुळे भारत एकदम कठोर झाला आहे. कोणत्याही किंमतीत चिनी सैन्याला भारतीय सीमेत घुसू देऊ नका, अशा कठोर सूचना भारतीय लष्कराकडून सीमेवर तैनात असलेल्या कमांडर्सना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्याने बुधवारी चीनला कडक इशारा दिला. चीनने वास्तविक नियंत्रण रेषेत घुसखोरी केली तर चोख उत्तर मिळेल, अशा शब्दांत चीनला इशारा दिला आहे.

लडाखमधील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे आणि सुमारे ३०-४० चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील रेझांग ला येथे भारतीय चौकीच्या अगदी जवळ असलेल्या भागात ठाण मांडून आहेत. यामुळे फॉरवर्ड पोझिशनवर भारतीय सैन्यांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ४५ वर्षानंतर सीमेवर हवाई गोळीबार करण्यात आला. दरम्यान, चीनी सैनिकांकडे धोकादायक शस्त्रे असलेली छायाचित्रेही समोर आली आहेत.

पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी सैन्याच्या कमांडर्समध्ये बुधवारी चर्चा झाली. हॉटलाइनवर चर्चा करताना सीमेवर तणाव वाढू नये, यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री गुरुवारी रशियाच्या मॉस्को येथे भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे दोन्ही देशांच्या सैन्यात एलएसीवर झालेल्या ताज्या संघर्षावर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशाचे परराष्ट्रमंत्री मॉस्को येथे शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) बैठकीस उपस्थित राहतील. संध्याकाळच्या बैठकीपूर्वी दोन्ही मंत्री रशिया-भारत-चीन यांच्यात दुपारच्या जेवणाच्या बैठकीत एकमेकांच्या समोरही असतील. या दोघांच्या भेटीचा उद्देश फक्त पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव कमी करणं हा आहे.