तर व्यापारी संबंधांवर परिणाम होतील; भारताचा चीनला इशारा

India -China

भारत-चीन सीमेवरील तणाव अद्याप कमी झालेला नाही. भारत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्नात असताना चीन आपल्या कुरापती मात्र थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दरम्यान, आता भारताने इशारा दिला आहे. “गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. सीमेवरील सध्याच्या परिस्थितीचे परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवरही होतील,” असा थेट इशारा भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिला.

“गेल्या काही दशकांमध्ये आपण अनेक संकटांचा सामना करत आहोत. चीनसोबत सध्या निर्माण झालेली परिस्थितीही त्यापैकीच एक असून गेल्या ४० वर्षांमध्ये जे झालं नाही ते यावेळी झालं. ४० वर्षांत आपण पहिल्यांदा सीमेवर आपले जवान गमावले आहेत,” असं श्रृंगला म्हणाले. देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही आणि करणारही नाही. भारत एक जबाबदार देश असून कायमच तो चर्चेसाठी तयार आहे. जोपर्यंत सीमाक्षेत्रात शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सामान्य होऊ शकत नाही. सीमेवर जी काही तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे त्याने द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होणार असल्याचं ते म्हणाले. सीमेवरील परिस्थिती आणि दोन्ही देशांतील संबंध एकमेकांशी जोडले गेले असल्याचंही श्रृंगला यांनी सांगितलं.

कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज

लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी देशवासीयांना आश्वासन देत कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं सांगितलं. देशवासीयांनी सैन्यावर विश्वास ठेवावा. एलएससीवर परिस्थिती गंभीर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवर लष्कराची तैनाती वाढवण्यात आली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी चर्चाही सुरू असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.