याला म्हणतात ‘इंडियन आर्मी’, पाकिस्तानी मेजरची कबर बघून केलं असं काही, सगळ्यांनी ठोकला सलाम!

indian army resuscitated a damaged grave of Major Mohd Shabir Khan, Sitara-e-Jurrat, Pakistan Army

सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं जातं. असंख्य वेळा घुसखोरी होते. भारतीय जवानांवर हल्ले केले जातात. त्यांना भारतीय लष्कराकडून देखील तोडीस तोड उत्तर दिलं जातं. पाकिस्तानच्या भुरट्या हल्ल्यांना परतवून लावलं जातं. पण भारतीय सैन्य अर्थात Indian Army कायमच पाकिस्तानी सैन्यापेक्षा उजवी ठरते. पण फक्त याचसाठी भारतीय लष्कराचा अभिमान भारतीयांच्या उरात ठासून भरलेला नसून त्यांच्यातल्या माणुसकीसाठीही भारतीय जवानांना हजारो वेळा सलाम ठोकण्यासाठी प्रत्येक भारतीयाचा हात कायम वर येत असतो. आपलं लष्कर यासाठी पात्र असल्याचं आजवर अनेकदा दिसून आलं आहे. नुकताच त्याचा आणखीन एक पुरावा समोर आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीय लष्कराचं कौतुक केलं जात आहे.

सीमाभागात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये…

अनेकदा भारतीय जवान शहीद होतात. मात्र, पाकिस्तानी लष्कराकडून त्यांचे मृतदेहही प्रोटोकॉलनुसार परत आणू दिले नसल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे. पण भारतीय जवानांनी त्यांच्यातलं भारतीयत्व कायम दाखवून दिलं आहे. १५ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी भारतीय लष्कराच्या श्रीनगरमधील जवानांनी एका पाकिस्तानी मेजरची उद्ध्वस्त झालेली कबर पुन्हा बांधकाम करून सुस्थितीत आणली आहे.

१९७२ साली नियंत्रण रेषेजवळ (LOC)…

झालेल्या चकमकीत मेजर मोहम्मद शबीर खान यांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कराच्या शीख रेजिमेंटने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेला लागून असलेल्या नौगाम सेक्टरमध्ये मेजर मोहम्मद शबीर यांची कबर बांधण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत तीची दुरवस्था झाली होती. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सला ही बाब ध्यानात आल्यानंतर त्यांनी लागलीच तीची डागडुजी केली. याची माहिती चिनार कॉर्प्सनं ट्वीटरवरून दिली आहे. ‘लढताना धारातीर्थी पडणाऱ्या जवानाला मृत्यूनंतरचा सन्मान मिळायलाच हवा. मग त्याचा देश कोणताही असो. इंडियन आर्मी यावर विश्वास ठेवणारी आहे. आपल्या याच तत्वाला जागून चिनार कॉर्प्सनं मेजर मोहम्मद शबीर खान यांची कबर दुरुस्त केली आहे’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काहीही झालं, तरी एक जवान हा कायम जवानच असतो, हे आर्मीचं उच्च तत्व भारतीय लष्करानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.