पुन्हा चितेंत वाढ! २४ तासात देशातील कोरोना रूग्णांची संख्या ९० हजार!

काल देशात कोरोना रूग्णांची दिलासादायक आकडेवारी समोर आली असताना आज मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशात कोरोना रूग्णांचा आकडा ४३ लाख पार गेला आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी ७५ हजार कोरोना रूग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा ८९ हजार ७०६ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात सध्या ४३ लाख ७० हजार १२९ कोरोनाबाधित रूग्ण आहेत.

तर गेल्या २४ तासात १११५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांची संख्या ७३ हजार ८९० झाली आहे. त्यातल्या त्यात ३३ लाख ९८ हजार ८४५ रूग्ण निरोगी झाले आहेत. तर अजूनही ८ लाख ९७ हजार ३९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान ज्या लसीची सगळे आतुरतेने वाट बघत अश्या कोरोनावरील लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची AZD1222 कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यामुळे कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे.


हे ही वाचा – वाईट बातमी: ऑक्सफर्डने थांबवली कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी!