लस तयार करण्यात भारताची प्रमुख भूमिका; पुरवठा करणं आव्हानात्मक

Microsoft founder Bill Gates

कोविड-१९ लस तयार करण्यात आणि पुरवण्यात भारताची मोठी भूमिका आहे. जगातील सर्व विकसनशील देशांना भारतातून तयार करण्यात आलेल्या लसीचा फायदा होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. गेट्स फाउंडेशन महामारीविरोधात लढण्यासाठी आणि लस विकसित करण्यासाठी मदत करत आहे.

बिल गेट्स म्हणाले, महायुद्धानंतरचं सर्वात मोठं संकट जगासमोर आहे. लसीसाठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागून आहे. ही लस विकसित होताच, डोस तयार करण्याची जबाबदारी भारतावर असेल. लस तयार करणे आणि पुरवठा करणे हे एक मोठं काम असेल. लस विकसित करण्याच्या जी प्रक्रिया सध्या सुरु आहे, त्यावरुन ही लस २०२१ पर्यंत येऊ शकते. लसीचा मोठ्या प्रमाणात डोस तयार करावा लागणार असून भारताकडे तेवढी क्षमता आहे, असं देखील बिल गेट्स म्हणाले.

चाचणी तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात

सध्या, अनेक देशांचे वैज्ञानिक आणि औषधी कंपन्या लस विकसित करण्यामध्ये गुंतलेले आहेत. काही लसी चाचणीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. वर्षाच्या अखेरीस ही लस तयार होईल अशी अपेक्षा आहे. गेट्स म्हणाले की, हे महायुद्ध नाही परंतु त्यानंतरची सर्वात मोठी घटना आहे. गेट्स बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात मोठी धर्मादाय संस्था आहे, जी साथीच्या रोगाविरूद्ध जगभरात मदत करत आहे. ही संस्था भारतासह सर्व देशांना मदत करत आहे.

बिल गेट्स फाउंडेशनचा सीरम इंस्टिट्यूट सोबत करार

या लसीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी व त्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी बिल गेट्स फाउंडेशनने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्व प्रकारच्या लसी बनवणाऱ्यांपैकी एक मोठी कंपनी आहे. गेट्स म्हणाले, लस तयार करण्यात भारताची मोठी भूमिका आहे, परंतु विकसनशील देशांपर्यंत नेणे हे खूप आव्हानात्मक आहे. म्हणूनच आम्ही लस उत्पादन आणि पुरवठा यंत्रणेत सामील आहोत. श्रीमंत देशांव्यतिरिक्त जगातील इतर देशांमध्ये ही लस पोहोचविणे आणि लोकांचे प्राण वाचविणे ही आपली जबाबदारी आहे.