घरताज्या घडामोडी'जय भवानी जय शिवाजी' च्या गजराने राजधानी दुमदुमली

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली

Subscribe

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त घोषणांनी आज राजधानीतील ल्युटियन दिल्लीचा आसमंत दुमदुमला. शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने  कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदनाच्या सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर खासदार संभाजी छत्रपती यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित खासदार सर्वश्री अरविंद सावंत, हेमंत गोडसे, डॉ. विकास महात्मे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

परदेशी पाहुण्यांनाही भावला शिवजयंती सोहळा

उत्साहाने ओतप्रोत या वातावरणाचे साक्षीदार झालेल्या १० देशांच्या राजदुतांनाही या सोहळ्याने भुरळ घातल्याचे चित्र दिसून आले आहे. महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला खासदार संभाजी छत्रपती आणि या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणाऱ्या पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस आणि इस्रायल या 10 देशांच्या राजदुतांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

- Advertisement -

वाद्यवृंदांचे सादरीकरण ठरले आकर्षण

सनई-चौघड्याच्या मधूर स्वरांनी सदनाचे वातावरण मंगलमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते. नाशिक येथील 200 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या पाईप बँड पथकाच्या खास शैलीतील सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच नऊवारीतील मुली आणि कुर्ता-पायजमातील फेटेधारी मुलांनी सादर केलेले लेझीमचे प्रात्यक्षिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेकाही धरायला लावला.

हणमंतराव गायकवाड यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज भूषण’ पुरस्कार

देश-विदेशात आपल्या कार्यकतृत्वाची पताका डौलाने फडकविणारे भारत विकास समुहाचे (बीव्हीजी) प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना खासदार संभाजी छत्रपती यांच्या हस्ते या सोहळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयोजन समितीच्यावतीने यावर्षीपासूनच या पुरस्काराची सुरुवात केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -