जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेतून बाहेर!

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढल्याने मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Srinagar

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. जम्मू-काश्मीरमधील अशांतता, पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या, वाढता दहशतवाद, विकास कामांमध्ये येणारा अडथळा, आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना राज्याचा कारभार सांभाळताना येणारे अपयश इत्यादी कारणे देत भाजपने पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी अर्थात पीडीपीचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार अल्पमतात आले आहे. भाजपने पाठिंबा काढल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीचे २८ तर भाजपचे २५ आमदार होते. सत्तास्थापनेसाठी भाजपने पीडीपीला पाठिंबा दिल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ३ वर्षांनंतर भाजपने पीडीपीला दिलेला पाठिंबा काढला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला मेहबुबा मुफ्ती जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांचा राजीनामा

भाजपने पाठिंबा काढल्यानंतर मेहमुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवून दिला आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाने तशी मागणीच राज्यपालांकडे केली आहे. राजीनाम्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मेहबुबा मुफ्ती पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहेत.

का काढला पाठिंबा?

दरम्यान, पीडीपीला ज्या विश्वासाने पाठिंबा दिला होता तो विश्वास पीडीपीने सार्थ ठरवला नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुफ्ती यांना दहशवतावाद रोखण्यास अपयश आल्याचे देखील यावेळी भाजपने म्हटले आहे. शिवाय,जम्मू-काश्मीरमधील अशांतता, पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या ही कारणे देखील भाजपने पाठिंबा काढताना दिली आहेत. भाजपने पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपाल यांना पाठवले आहे. भाजपने पाठिंबा काढल्याने नंतर संध्यााकाळी ४ वाजता पीडीपीने बैठकीचे आयोजन केले आहे. भाजपने पाठिंबा काढल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सशी मिळून सत्ता स्थापन करण्यास पीडीपीने मात्र नकार दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने देखील संध्याकाळी बैठकीचे आयोजन केले असून पुढील राजकीय चालीवर यावेळी विचारमंथन केले जाणार आहे.

काँग्रेसचा भाजप – पीडीपीवर गंभीर आरोप

भाजपने आपला स्वार्थ साधून झाल्यानंतर पीडीपीचा पाठिंबा काढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. दोन्ही पक्षांनी मिळून मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केला. भाजप आणि पीडीपीने एकत्र येत जम्मू -काश्मीरची पूर्णपणे वाट लावली. शिवाय दहशतवाद रोखण्यास देखील भाजप – पीडीपीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे. दरम्यान, पाठिंबा काढून भाजप जबाबदारीपासून पळ काढत असल्याचे आझाद यांनी यावेळी म्हटले. ‘पीडीपीला पाठिंबा देऊ नका’ असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. पण, मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, काँग्रेस पीडीपीला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही असे देखील आझाद यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेची भाजपवर टीका

जम्मू – काश्मीरमध्ये सत्ता सोडण्याचा भाजपचा निर्णय राजकीय चाल असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच जम्मू – काश्मीरमधील भाजप – पीडीपीची युती अभद्र होती. सत्ता स्थापन केल्यापासून राज्यामध्ये हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना येत्या निवडणुकीत काय उत्तर देणार? हा प्रश्न भाजपला सतावत होता. म्हणूनच भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांच्या निशाण्यावर पीडीपी

भाजपने काढलेला पाठिंबा हा पीडीपीसाठी धडा आहे. शिवाय पीडीपीसाठी आपल्याला कोणतीही सहानुभूती नसल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.