जम्मू – काश्मीरमधील निर्बंध १५ ऑगस्टनंतर शिथील करणार – सत्यपाल मलिक

जम्मू काश्मीरमधील निर्बंध १५ ऑगस्टनंतर शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.

Jammu kashmir
राज्यपाल सत्यपाल मलिक

केंद्रातील मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे करण्यात आले आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. कलम ३७० हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. मात्र कलम ३७० हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधील निर्बंध १५ ऑगस्टनंतर शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.

काय म्हणाले सत्यपाल मलिक

फोन, इंटरनेट या माध्यमांमार्फत युवकांची दिशाभूल करण्याचे तसेच त्यांना भडकवण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील. आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचे देखील राज्यपालांनी यावेळी सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण 

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीका केली होती. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोलाही लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा, असे आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिले आहे.