जेट एअरवेज अजूनही संकटात, परिस्थिती गंभीर

जेट एअरवेज कंपनी सध्या एक अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ६,८९५ कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली आहे.

Mumbai
jet airways operating only 41 aircrafts, dgca reports

गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात अडकलेल्या जेट एअरवेज कंपवीच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलं आहे. मंगळवारी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जेट एअरवेजची फक्त ४१ विमानंच उड्डाण करत आहेत. खरतंर जेट एअरवेज कंपनीची मूळ क्षमता ११९ विमानांची आहे. मात्र, आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजकडून केवळ एक तृतीयांश विमानांचाच वापर सुरू आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीकडून कर्जदाते आणि त्यांचा मोठा भागीदार एतिहाद एअरवेजकडून मदत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याबाबत डीजीसीएने दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘जेट एअरवेज कंपनीची परिस्थिती खूपच गंभीर आहे. जेट एअरवेजच्या विमानांची संख्या आगामी आठवड्यात आणखी कमी होऊ शकते. जेटने सोमवारी आपल्या आणखी ४ विमानांचे उड्डाण रोखले होते. भाड्याने घेतलेल्या विमानांचे भाडे न दिल्यामुळे आता फक्त ४१ विमानंच उड्डाण करत आहेत. यापुढे या संख्येत अजून घट होऊ शकते’.

 

जेट एअरवेज कंपनी सध्या एक अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ६,८९५ कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली आहे. त्यामुळे कंपनी बँक, पुरवठादार, वैमानिकांना वेळेवर पैसे देऊ शकत नाही. तर यापैकी काहींनी जेट एअरलाइनबरोबरील करार संपुष्टात आणला आहे. दुसरीकडे, जेट एअरवेजने उड्डाण करत नसल्यामुळे वैमानिक, केबिन क्रू आणि ग्राऊंड स्टाफपैकी कोणी तणावाची तक्रार करत असेल तर त्यांना ड्युटी लावली नाही पाहिजे, असेही डीजीसीएने म्हटले आहे. तसंच कंपनीने आपल्या विमानांचीही नियमितपणे देखभाल केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here