घरताज्या घडामोडीनोटबंदीमध्ये ज्वेलर्सनी बोगस बिल दाखवून 'ब्लॅक मनी केला व्हाईट'

नोटबंदीमध्ये ज्वेलर्सनी बोगस बिल दाखवून ‘ब्लॅक मनी केला व्हाईट’

Subscribe

देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याबरोबरच काळा पैसा हद्द्पार करण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी लागू केली. पण याचाच गैरफायदा घेत ज्वेलर्स गँगने काळा पैसा पांढरा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटबंदी लागू होताच देशातील जास्तीत जास्त ज्वेलर्सनी करोडो रुपये बँकेत जमा केले. हा पैसा दागिन्यांच्या विक्रीतून आल्याची बिलेही त्यांनी बँकेत जमा केली. पण ही बिले बोगस असल्याची धक्कादायक माहिती वित्तमंत्रालयाने केलेल्या तपासणीत समोर आली आहे.

नोटबंदीच्या काळात एका ज्वेलर्सच्या बँक खात्यातील जमा रकमेत अचानक ९३ हजार ६४८ टक्क्यांची वाढ झाली. यामुळे बँक अधिकाऱ्यांसह वित्तमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. जो ज्वेलर्स नोटबंदी आधी खात्यात वर्षाला २ ते ३ लाख एवढीच रक्कम जमा करायचा त्याने काही दिवसांतच करोडो रुपये जमा केल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्याच्याकडे ज्यावेळी या जमा रकमेचा तपशील मागण्यात आला त्यावेळी त्याने काही बिले सादर केली. जी बोगस असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तसेच अचानक करोडो रुपये कुठून आले, याचे समाधानकारक उत्तरही त्याला देता आले नाही. यामुळे खडबडून जागे झालेल्या वित्तमंत्रालयाने नोटबंदीच्या काळात बँकेत पैसे जमा केलेल्या देशातील सर्व ज्वेलर्सची यादी मागवली. त्यात ज्वेलर्सनी या कालावधीत करोडो रुपये जमा केल्याचे समोर आले. तसेच या जमा रकमेची कुठलीही माहिती ज्वेलर्सने २०१७-१८ च्या इनकम टॅक्स रिटर्नच्या अर्जात दिलेली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

- Advertisement -

यात गुजरातमधील एका ज्वेलर्सनी नोटबंदीच्या दुसऱ्याच दिवशी ९ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर या दरम्यान ४ करोड १४ लाख ९३ हजार रुपये बँकेत जमा केले. हाच ज्वेलर्स २०१५ पर्यंत वर्षाला ४४, २६० रुपये जमा करत होता. तसेच नोटबंदीच्या दरम्यान असुक्षित कर्ज वाटपाच्या संख्येतही मोठया प्रमाणावर वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे. वर्षाला ६४, ५५० रुपये इनकम टॅक्स भरणाऱ्या एका ज्वेलर्सने ९ नोव्हेंबर २०१५ पासून ९ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत ६.२२ करोड रुपयाची रोख रक्कम बँकेत जमा केली. पण ही रक्कम कुठून आली याची समाधानकारक उत्तरे त्याला देता आली नाहीत. अशा अनेक ज्वेलर्सचा लेखाजोगा वित्तमंत्रालयाने बँकांकडून मागवला आहे. त्यात ज्वेलर्सने बोगस बिले दाखवून सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -