जेएनयूत पुन्हा ‘कॉम्रेड’राज; अभाविपचा सुपडा साफ

जेएनयू विद्यापीठाचा गड पुन्हा एकदा डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी राखला असून अभाविपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

New Delhi
JNU Election 2018

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकांमध्ये डाव्या विचारांच्या संघटनांनी बाजी मारली आहे. आइंसा, एसएफआई, एआईएसएफ आणि डीएसएफ या संघटनांच्या लेफ्ट युनिटीने चारही जागांवर बाजी मारली आहे. निवडणूक समितीच्या रिपोर्टनुसार ५,१८५ मतांच्या मोजणीनंतर अध्यक्षपदी लेफ्ट युनिटीचे एन.साई. बालाजी यांनी ११७९ मतांनी विजय मिळवला आहे. तर उपाध्यक्ष, महासचिव आणि सयुंक्त सचिव पदासांठीही लेफ्टच्याच उमेदरांचा विजय झाला आहे. अभाविपने (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) जंग जंग पछाडूनही त्यांच्या पदरी या निवडणूकीतही निराशाच पडली आहे. त्यांच्या सर्व उमेदवारांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. तर बाप्साचे (बिरसा-फुले-आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन) उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले.

जेएनयू विद्यापीठात अनेक वर्षांपासून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा प्रभाव राहिलेला आहे. तो यंदाही कायम राहिला. एन. साई. बालाजी याने अभाविपच्या ललित पांडेचा परभाव केला आहे. तर उपाध्यक्षपदी सारिका चौधरी २५९२, महासचिवपदी एजाज अहमद राथेर २४२६ आणि संयुक्त सचिवपदी अमुथा २०४७ मतांनी युनायटेड लेफ्टचे उमेदवार विजयी झाले आहेत.

शुक्रवारी जेएनयूमध्ये मतदान पार पडले होते. मात्र मतमोजणीदरम्यान शनिवारी विद्यापीठाच्या कँम्पसमध्ये अभाविपने मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत त्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे १४ तासानंतर आज मतमोजणी करण्यात आली. यावेळी जेएनयूमध्ये ६७.८ टक्के मतदान झाले होते. मागच्यावर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी जास्त असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास ५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयूवर ताबा मिळवण्यासाठी अभाविप धडपडत आहे, मात्र जेएनयू हा कॉम्रेड्सचा अभेद्य गड असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले.