घरदेश-विदेशकर्नाटक पोटनिवडणूक : काँग्रेस-जेडीएसने केला ४-१ ने भाजपचा पराभव

कर्नाटक पोटनिवडणूक : काँग्रेस-जेडीएसने केला ४-१ ने भाजपचा पराभव

Subscribe

लोकसभा निवडणूकीआधीच कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीने भाजपवर मोठा विजय मिळवला आहे. आज कर्नाटक राज्यात तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये भाजपला केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. काँग्रेसने बल्लारी हा लोकसभा मतदारसंघात तर जामखंडी या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर जेडीएसने, रामनगर आणि मंड्या मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. तर भाजपला शिवमोगा या एकाच लोकसभा या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांचा हा टीझर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

कर्नाटकातील ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये काँग्रेस-जेडीएसने भाजपला धुळ चारल्याचे मतदानाच्या आकडेवारीवून दिसून येते. बल्लारी हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र काँग्रेसच्या व्ही. एस. उग्रप्पा यांनी भाजपच्या जे. शांथा यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मत घेऊन पराभव केला आहे. जवळपास एक लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला आहे. जामखंडी या विधानसभेच्या मतदारसंघात काँग्रेसच्या ए.एस.न्यामगौडा यांनी भाजपच्या श्रीकांत कुलकर्णी यांचा ३९,४८० मतांनी विजय मिळवला आहे.

- Advertisement -

जेडीएसनेही दोन जागांवर विजय मिळवून ही आघाडी किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या एल चंद्रशेखर यांचा तब्बल १,०९,१३७ मतांनी पराभव केला आहे.

कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा मुलगा राघवेंद्रने शिवमोग्गा हा लोकसभा मतदारसंघ राखला आहे. त्यांनी जेडीएसच्या मधुबंगरप्पा यांचा ४७ हजार मतांनी धुव्वा उडवला आहे.

- Advertisement -

या विजयानंतर पत्रकार परिषद घेऊन कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. “ही निवडणूक पुढच्यावर्षीच्या निवडणुकांची पुर्वतयारी आहे. आम्ही कर्नाटकमधील लोकसभेच्या २८ जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. काँग्रेससोबतची आमची आघाडी अभेद्य असून आजचा विजय आमच्या लोकांना आत्मविश्वास मिळवून देईल.”, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

यावेळी कुमारस्वामी यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना भाजपने २५ ते ३० कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र आमच्या आघाडातील उमेदवार त्यांच्या आमिषाला बळी पडले नाहीत.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनीही ट्विट करत भाजपची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, “४-१ हा निकाल कसोटी मालिकेच्या निर्णयासारखा वाटतोय. जसे की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकली आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -