१५०० किलो प्लास्टिक बॉटलपासून बनवले रिसायकल हाऊस

कर्नाटकातील हे पहिले पर्यावरणपूरक असे रिसायकल प्लास्टिकचे घर आहे.

karnataka gets its first recycled plastic house in mangaluru
१५०० किलो प्लॉस्टिक बॉटलपासून बनवले रिसायकल हाऊस

प्लास्टिक ही अशी वस्तू आहे जी पूर्णपणे संपत नाही. प्लास्टिकला पूर्णपणे नष्ट होण्यासाठी बरीच वर्षे लागतात. प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणाच्या समस्येत प्रामुख्याने वाढ झाली आहे. कचऱ्यात पडलेल्या प्लास्टिकपासून कर्नाटकात राहणाऱ्या एका इंजिनिअरने डौलदार घर तयार केले आहे. ‘प्लास्टिक फॉर चेंज फाउंडेशन’च्या मदतीने टाकाऊ प्लास्टिकपासून घर तयार करण्यात आले आहे. हे घर कर्नाटकमधील मंगळूरू येथे तयार करण्यात आले आहे. कर्नाटकातील हे पहिले पर्यावरणपूरक असे रिसायकल प्लास्टिकचे घर आहे.

‘प्लास्टिक फॉर चेंज फाउंडेशन’ हे कर्नाटकच्या समुद्राच्या तळाशी जमा झालेले प्लास्टिक गोळा करण्याचे आणि कचरा वेचणाऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी ही संस्था काम करते. समुद्रातून आलेल्या प्लास्टिकपासून त्यांनी रिसायकल हाऊस तयार केले आहे. हे घर तयार करण्यासाठी १५०० किलोग्रॅम रिसायकल प्लास्टिकचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे घर तयार करण्यासाठी जवळपास ४.५ लाखांचा खर्च आला आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.

प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले घर पर्यावरणपूरक आणि इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घर तयार करण्याआधी घरासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची क्वालिटी टेस्ट करण्यात आली. जेणेकरून बांधलेले घर सुनिश्चित काळासाठी टिकून राहिल. २०२१ मध्ये कचरा वेचणाऱ्या लोकांसाठी अशाच प्रकारची २० घरे बनवणार असून ज्यात २० टन प्लास्टिकचा उपयोग केला जाणार आहे, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.