Live Update: मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार : मुख्यमंत्री

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरं बंद आहेत. मात्र नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुंबईतिल सिध्दिविनायक, शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि नाशिकच्या काळाराम मंदिराला फुलांची आरास आणि आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.


थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी जैसलमेरला पोहोचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी यंदा ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना उपस्थित आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथून भारत-पाकिस्तानची सीमारेषा जाते. या ठिकाणी सीमेवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. प्रसिद्ध तनोट माता मंदिरही याच ठिकाणी आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी येथील लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली तसेच दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप करणार आहेत.


देशात २४ तासात ४७ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

देशात ४४, ६८४ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८७,७३. ४७९ पर्यंत पोहोचला आहे. तर २४ तासात ५२० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात ४ लाख ८० हजारांहून अधिकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सर्व नागरिकांना दिल्या शुभेच्छा…


देशात १३ नोव्हेंबरपर्यंत 12,40,31,230 कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली तर काल दिवसभरात 9,29,491 नमुने तपासणी केली असल्याची माहिती ICMR ने दिली.


दिवाळीनिमित्त साई मंदिराला आकर्षक रोषणाई

दिवाळीनिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून समाधी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी बंद असले तरी साई मंदिरात साध्या पद्धतीने दीपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे.