हैदराबाद बलात्कार प्रकरण : पोलिसांवर फुलांचा वर्षाव

Hyderabad
Locals had showered rose petals on Police personnel at the spot where accused in the rape and murder of the woman veterinarian were killed in an encounter
हैदराबाद बलात्कार प्रकरण : पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैदराबाद बलात्कार प्रकरणाचा तपास लावत असताना पळून जाणाऱ्या आरोपींचा एन्काऊंटर करणाऱ्या तेलंगणा पोलिसांवर तेथील स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे देशभरातील नागरिकांकडून समर्थन करण्यात येत आहे. या घटनेचे समर्थन करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कायदेतज्ज्ञांनी पोलिसांच्या या कारवाईवर टीका केली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली ही प्रक्रिया चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 हैदराबादच्या शमशाबाद येथे २७ नोव्हेंबर रोजी चार ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांनी मिळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर या चारही नराधमांनी पीडितेला जिवंत जाळले होते. या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना ठेचून काढा, अशी प्रतिक्रिया देशभरातून उमटत होती. दरम्यान, याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींना शोधून काढले. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली होती. विषयाचे गांभिर्य पाहून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु करण्यात आला होता. तेलगंणा पोलीस याप्रकरणी आणखी तपास लावत होती. तपास लावण्यासाठीच ते गुरुवारी रात्री चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले. तिथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांना नाईलाजास्तव त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. यात त्यांचा मृत्यू झाला.