घरदेश-विदेशलोकसभेचे सभापती भाजप खासदारावर भडकले; म्हणे, 'केंद्र सरकार नळ बसवणार का?'

लोकसभेचे सभापती भाजप खासदारावर भडकले; म्हणे, ‘केंद्र सरकार नळ बसवणार का?’

Subscribe

भाजप खासदाराच्या प्रश्नावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच भडकले. 'आता तुमच्या भागातल्या मंदिरातले पाण्याचे नळ देखील केंद्र सरकार बसवणार का?' असा प्रश्न त्यांनी या खासदार महोदयांना विचारला!

देशाची संसद म्हणजे लोकशाहीचं प्रतिक, सन्मान, पवित्र स्थान वगैरे उपमा आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे संसदेबद्दलचा आपला आदर अधिकच वाढतो. पण या संसदेमध्ये खासदारांनी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारावेत, याचे देखील काही प्रघात असतात. आणि ते पाळले नाहीत, तर सभागृहाचे सदस्य काहीही प्रश्न संसदेत विचारू शकतात. लोकसभेमध्ये असाच काहीसा प्रकार घडल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजपच्या एका खासदारांवर चांगलेच भडकले. एवढंच नाही, तर त्यांनी या महाशयांना सुनावलं देखील. ‘इथे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा सुधारा’, असं बिर्ला म्हणाले. पण असं काय झालं होतं लोकसभेत?

‘म्हणे आमच्या इथे रस्ताच नाही!’

झालं असं, की भाजपचे मध्य प्रदेशमधले खासदार गुमन सिंह दमोर यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘रतलाममधल्या एका जुन्या मंदिराची दुरुस्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. वारंवार सांगून देखील त्याची दुरुस्ती का केली गेली नाही?’ दमोर यांच्या या प्रश्नावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रीतसर लेखी स्वरूपात उत्तर देखील दिलं. पण एवढ्यावर दमोर यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुढे याच मुद्द्यावर पुरवणी प्रश्न उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं, की या मंदिराकडे जाणारा रस्ता देखील चांगला नसून तो बांधला का गेला नाही? यासाठी त्यांनी उदाहरण देखील दिलं. ते म्हणाले, ‘हे म्हणजे असं झालं नवीन लग्न करून वधू सासरी गेली आणि कळलं की तिथे शौचालयच नाही!’

- Advertisement -

हेही वाचा – तृतीयपंथांना दिली संधी; ओडिशात सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती

‘नळ बसवायची कामं केंद्र सरकार करणार का?’

यानंतर मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पारा चढला. त्यांनी सभागृहातल्या सर्वच सदस्यांना आपल्या प्रश्नांचा दर्जा सुधारण्याबाबत सुनावलं. ‘या सभागृहात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे. जर एखाद्या सदस्याला एखाद्या स्थानिक मंदिरामध्ये पाण्याचा नळ बसवायचा असेल, तर ते काम काही केंद्र सरकार करणार नाही.’ दरम्यान, गुमन सिंह दमोर यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -