मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखणार की कमलनाथ पुन्हा बाजी मारणार?; पोटनिवडणुकीचा निकाल आज

madhya pradesh by election results bjp congress shivraj singh chauhan kamalnath

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार निवडणुकीबरोबरच मध्य प्रदेशातही विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या दोन नेत्यांमध्ये कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ येणार की कमलनाथ याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्यासोबत २२ समर्थक आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे कमलनाथ सरकारला पायउतार व्हाव लागले आणि भाजप सत्तेत आली. दरम्यान, कमलनाथ यांचे सरकार येणे सहजसोपे नक्कीच नाही. भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ८ जागा जिंकणे आवश्यक आहे. ऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला १६ ते १८ जागा मिळणार आहेत. तर काँग्रेसला १० ते १२ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही अतितटीची लढाई आहे. याचे चित्र प्रचारसभेत दिसले. प्रचारसभा वादग्रस्त विधानांनी चांगलीच गाजली. मध्य प्रदेश विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३० आहे. आमदार राहुल सिंह यांनी राजीनामा दिल्याने सध्या २२९ आमदार आहे. त्यामुळे बहुमतासाठी ११५ जागांचे बहुमत असणे आवश्यक आहे. भाजपाकडे सध्या १०७ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ८७ आमदार आहेत. बसपा २, सपा १ आणि ४ अपक्ष आमदार आहेत.