तो बाप असतो; पोराच्या हट्टापायी बापानं लाकडापासून बनवली सायकल

wooden bicycle tamil nadu

‘आपल्या मुलांच्या आनंदासाठी जो स्वतः झिजून चेहऱ्यावर हसू दाखवत असतो’, तो बाप असतो. मुलांच्या सुखासाठी राब राब राबणारा बापच असतो. बापाच्या या गोष्टीत भर पडलाय आणखी एका किस्स्याचा. तामिळनाडूमधील मदुराई येथील एका बापाने आपल्या मुलाचा सायकलचा हट्ट पुरविण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. व्यवसायाने सुतार असलेल्या सुर्यमुर्ती नावाच्या इसमाने आपल्या मुलाचा सायकलाचा हट्ट पुरविण्यासाठी लाकडापासून सायकल बनविली. ही सायकल ८ दिवसांत बनवून तयार झाली. या सायकलचे टायर, रिम, ब्रेक आणि साखळी सोडली तर बाकी सर्व लाकडाचे मटेरियल वापरले आहे.

आपल्या ७ वर्षांच्या मुलाचा सायकलचा हट्ट पुरविण्यासाठी सुर्यकुमार यांनी हे कमाल करुन दाखविले. आर्थिक चणचणीमुळे नवीन सायकल घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या लाकडाच्या कलेचा त्यांनी सायकल बनविण्यासाठी वापर केला. या अनोख्या सायकलची माहिती मिळाल्यानंतर लोकांकडून सुर्यकुमार यांचे कौतुक होत आहे. सुर्यकुमार यांच्या कलेने अनेकांना प्रभावित केले आहे. सायकल सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नेटिझन्सनी दिली आहे.

याआधी पंजाबमध्ये देखील लाकडाची सायकल बनविण्याचा प्रयोग करण्यात आलेला आहे. धनी राम सग्गू यांनी लाकडाची सायकल तयार केली होती. लॉकडाऊन दरम्यान नोकरी गेल्यानंतर धनीराम यांनी घरी बसल्या बसल्या ही सायकल बनवली होती. धनीराम यांच्या सायकलला सुद्धा अनेकांनी पसंती दिली होती. तसेच या इको फ्रेंडली सायकलला काही लोकांनी विकतही घेतले होते.