धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

mahendra singh daughter
महेंद्र सिंह धोनी, पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लाघ्य कमेंट करणाऱ्या आरोपीला गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली आहे. कच्छ पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कोलकाता नाईट रायडर्स विरोधातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाल्यानंतर चुकीची कमेंट पोस्ट केली होती. संतापाच्या भरात त्याने महेंद्र सिंह धोनीच्या पाच वर्षीय मुलीवर अभद्र अशी कमेंट टाकली होती. गुजरात पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या आरोपीला रांची पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.

मात्र तुम्हाला आरोपीची माहिती कळल्यानंतर धक्काच बसेल. कारण हा आरोपी अल्पवयीन असून सध्या बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. गुरुवारी जेव्हा CSK vs KKR चा सामना झाला. तेव्हा केकेआरने आधी फलंदाजी करत २० षटकात १६७ धावांचे लक्ष्य चेन्नईला दिले. मात्र चेन्नईच्या फलंदाजांना १५७ धावाच करता आल्या. कोलकाताचा १० धावांनी विजय झाला. त्यानंतर या आरोपीने चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला सोशल मीडियावर धमकी दिली होती.