धक्कादायक! फेसबुक लाईव्ह करत असताना तरुणाचा मृत्यू!

Kolkata
Death
प्रातिनिधिक छायाचित्र

फेसबुक लाईव्ह ही आजकालची सामान्य बाब झाली आहे. हल्ली सगळेच वेगवेगळ्या विषयांवर किंवा घटनांवर फेसबुक लाइव्ह करत असतात. पण पश्चिम बंगालमधल्या एका २५ वर्षांच्या तरुणाला फेसबुल लाईव्ह करणं महागात पडलं आहे. हे फेसबुक त्याच्या जीवावरच बेतलं असून रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू ओढवला आहे. चंचल धिबर असं या तरुणाचं नाव असून तो पश्चिम बंगालच्या वेस्ट बर्दवान जिल्ह्याचा रहिवासी होता. मृत्यूपूर्वी त्याने ६३ सेकंदांचं फेसबुक लाईव्ह केलं असून त्याला २ हजाराहून जास्त व्यूज मिळाले आहेत.

नक्की घडलं काय?

चंचल नजीकच्या मंदिरात पूजा करून परत येत होता. त्याच्याकडे बाईक होती. मात्र, बाईकवर असतानाच तो फेसबुक लाइव्ह करत होता. फेसबुकवर बोलता बोलता तो कमेंट्समध्ये येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देखील देत होता. मात्र, हे करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो बाईकवरून फरफटत गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामध्ये चंचलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला लागलीच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, जखमा इतक्या गंभीर होत्या, की उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सेल्फी काढताना अनेकदा अशा प्रकारच्या गंभीर घटना घडल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण फेसबुकवर लाईव्ह करत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवणं ही कदाचित या स्वरूपाची दुर्मिळ घटना असावी.


हेही वाचा – फेसबुक लाइव्ह पडले महागात; राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष महिलेवर गुन्हा