घरदेश-विदेशचुकून त्याने भोगली १७ वर्ष कारावासाची शिक्षा!

चुकून त्याने भोगली १७ वर्ष कारावासाची शिक्षा!

Subscribe

फक्त चेहरेपट्टी एका अट्टल चोरासारखी असल्यामुळे एका निरपराध नागरिकाला तब्बल १७ वर्ष कारावास भोगावा लागल्याचा अजब प्रकार कन्सासमध्ये घडला आहे. त्यामुळे आता या व्यक्तीने अमेरिकी पोलिस प्रशासनाकडून लाखो अमेरिकी डॉलर्सची नुकसान भरपाई मागितली आहे.

आपल्याकडे असं म्हणतात की १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निष्पापाला शिक्षा मिळू नये. त्यासाठी विविध प्रकारच्या तरतुदी आपल्याकडच्या कायद्यामध्ये करण्यात आल्या आहेत. पण अशी एक घटना आता समोर आली आहे, ज्यामध्ये एक व्यक्तीने चुकून तब्बल १७ वर्ष कारावासाची शिक्षा भोगली आहे. आणि तीही अशा गुन्ह्यासाठी जो त्यानं केलेलाच नाही! या व्यक्तीचा चेहरा आणि गुन्हेगाराचा चेहरा इतका मिळता-जुळता होता, की साक्षीदारानं गुन्हेगार म्हणून थेट या व्यक्तीविरोधात साक्ष दिली आणि त्याची शिक्षा म्हणून एका निरपराध माणसाला तब्बल १७ वर्ष कैदेत राहावं लागलं. अमेरिकेतल्या कन्सास प्रांतात हा अजब प्रकार घडला आहे.

मोबाईल चोरीसाठी १७ वर्षांची शिक्षा!

३१ मे १९९९ रोजी कन्सासमधल्या वॉलमार्ट पार्किंगबाहेर हा गुन्हा घडला. संध्याकाळी ८च्या सुमारास एका इसमाने एका महिलेच्या हातातली पर्स हिसकून नेण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं विरोध केल्यानंतर हा इसम पर्स नेऊ शकला नाही, मात्र त्या महिलेचा मोबाईल चोरून नेण्यात तो यशस्वी ठरला. यावेळी सदर इसमाला पाहाणाऱ्या दोन साक्षीदारांनी त्याचा चेहरा नीटसा पाहिला नाही. मात्र, त्याचा रंग आणि चेहरेपट्टी त्यांच्या लक्षात राहिली. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्यांना तशाच चेहरेपट्टीच्या ६ लोकांचे फोटो दाखवले, तेव्हा त्यांनी रिचर्ड जोन्सचा फोटो गुन्हेगाराचा म्हणून सांगितला, आणि इथेच सगळा घोळ झाला!

- Advertisement -

चेहरा साधर्म्यामुळे फसला जोन्स

अट्टल गुन्हेगार रिकी अमोसच्या चेहऱ्याशी जोन्सचा चेहरा मिळता-जुळता आहे. त्यामुळे साक्षीदारांनी जोन्सचा फोटो गुन्हेगाराचा म्हणून ओळखल्यानंतर त्याला कोर्टानं कारावासाची शिक्षा सुनावली. पण तुरुंगात जेव्हा इतर कैदी जोन्सला रिकी म्हणून बोलावू लागले, तेव्हा त्याला सगळा प्रकार लक्षात आला.

१७ वर्षांनंतर निर्दोष सुटका

या सगळ्या प्रकाराविरोधात अपील केल्यानंतर जोन्सची न्यायालयानं अटकेच्या १७ वर्षांनंतर सुटका केली. आपल्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून आता जोन्सनं प्रतिवर्षी ६५ हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच १७ वर्षांसाठी १.१ मिलियन अमेरिकी डॉलर इतकी नुकसान भरपाई मागितली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -